Tokyo 2020 : भारताच्या रणरागिणींचा दक्षिण आफ्रिकेवर विजय, वंदनाची विक्रमी हॅट्ट्रिक!

भारताच्या उपांत्यपूर्व फेरीच्या आशा कायम

tokyo olympics 2020 India beat south africa in pool a match
टीम इंडिया

भारतीय महिला हॉकी संघाने पूल-ए च्या शेवटच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ४-३ असा पराभव केला. यामुळे टोक्यो ऑलिम्पिकच्या उपांत्यपूर्व फेरीसाठी भारताच्या आशा कायम राहिल्या आहेत. भारतासाठी वंदना कटारियाने तीन आणि नेहा गोयलने एक गोल केला. वंदना कटारिया ऑलिम्पिक सामन्यात हॅट्ट्रिक करणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. भारतीय हॉकी संघ पुढील फेरीत जाण्याच्या आशा अजूनही आहेत. जर ब्रिटनने आज आयर्लंडला हरवले, तर भारत उपांत्यपूर्व फेरी गाठेल.

वंदना कटारियाने पहिल्या क्वार्टरमध्ये भारताला शानदार सुरुवात करून दिली आणि चौथ्या मिनिटाला गोल केला. मात्र, दक्षिण आफ्रिकेने पहिल्या क्वार्टरच्या शेवटच्या क्षणात बरोबरी साधली. दुसऱ्या क्वार्टरमध्येही वंदनाने आक्रमक खेळ दाखवत स्कोअर २-१ असा केला. दक्षिण आफ्रिकेने मात्र भारताच्या अत्यंत कमकुवत संरक्षण रेषेला दुसऱ्यांदा छेद दिला. पूर्वार्धात सामना २-२ असा बरोबरीत होता.

 

 

हेही वाचा – बेन स्टोक्सनं घेतला क्रिकेटविश्वाला हादरवून टाकणारा निर्णय, लोकांनी दिल्या ‘अशा’ प्रतिक्रिया

तिसऱ्या क्वार्टरमध्ये नेहा गोयलच्या गोलच्या मदतीने भारताने पुन्हा एकदा जबरदस्त सुरुवात केली आणि आघाडी ३-२ अशी वाढवली. पण दक्षिण आफ्रिकेने जबरदस्त पुनरागमन केले आणि तिसरा गोल केला. सामन्याच्या ४९व्या मिनिटाला कटारियाने तिसरा गोल करत भारताला ४-३ अशी आघाडी मिळवून दिली.

सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या भारतीय संघाने रिओ ऑलिम्पिकमध्ये १२वे स्थान मिळवले होते. यंदा पहिल्या तीन सामन्यांमध्ये भारताला जागतिक नंबर वन नेदरलँड्सने ५-१, जर्मनीने २-० आणि गतविजेता ब्रिटनने ४-१ ने पराभूत केले. चौथ्या सामन्यात नवनीत कौरच्या गोलमुळे भारताने आयर्लंडचा १-० असा पराभव केला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Tokyo olympics 2020 india beat south africa in pool a match adn

ताज्या बातम्या