शुक्रवारी ब्रिटनशी कांस्यपदकासाठी लढत

टोक्यो : पुरुषांप्रमाणेच भारतीय महिला हॉकी संघाचे टोक्यो ऑलिम्पिकमधील सुवर्णस्वप्न बुधवारी उद्ध्वस्त झाले. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या अर्जेटिनाने झुंजार वृत्तीच्या भारताला २-१ असे पिछाडीवरून नमवले.

राणी रामपालच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारताने उपांत्य लढत गमावली असली, तरी शुक्रवारी त्यांना कांस्यपदक जिंकण्याची संधी आहे. अन्य उपांत्य लढतीत नेदरलँड्सविरुद्ध पराभव पत्करणाऱ्या ब्रिटनशी भारताची कांस्यपदकाच्या लढतीत गाठ पडणार आहे. मंगळवारी भारताच्या पुरुष संघालासुद्धा उपांत्य फेरीत बेल्जियमने नमवले.

शोर्ड मरिन यांच्या मार्गदर्शनाखाली महिला संघाने उपांत्यपूर्व लढतीत जगज्जेत्या ऑस्ट्रेलियाला धूळ चारून अविश्वसनीयरीत्या ४१ वर्षांत प्रथमच उपांत्य फेरीत प्रवेश केला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध निर्णायक गोल करणाऱ्या गुर्जित कौरने या वेळीही सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर अप्रतिम गोल झळकावून भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. पहिल्या सत्रात भारताला ही आघाडी टिकवण्यात यश आल्यामुळे अर्जेटिनावरील दडपण वाढले.

दुसऱ्या सत्रात मात्र अतिबचावात्मक पवित्रा भारताच्या अंगलट आला. याचा लाभ उचलून कर्णधार मारिआ बॅरिओन्यूव्होने १८व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदवत अर्जेटिनाला बरोबरी साधून दिली. तिसऱ्या सत्रातसुद्धा बॅरिओन्यूव्होनेच ३७व्या मिनिटाला संघासाठी दुसरा गोल झळकावून भारताच्या आशांना सुरुंग लावला.

चौथ्या सत्रात भारताने बरोबरी साधण्यासाठी अथक प्रयत्न केले. सामना संपायला १७ सेकंद शिल्लक असताना भारताला गोल करण्याची सुवर्णसंधी होती. परंतु अर्जेटिनाची गोलरक्षक मारिआ सुशीने उत्तम बचाव करताना भारताचे प्रयत्न हाणून पाडले आणि याबरोबरच भारताच्या पराभवावर शिक्कामोर्तब झाले.

कांस्यपदकासाठी आज बलाढय़ जर्मनीशी सामना

टोक्यो : उपांत्य फेरीमधील निराशाजनक पराभव मागे टाकून ४१ वर्षांचा ऑलिम्पिक पदकाचा दुष्काळ संपवण्याच्या इराद्याने भारतीय पुरुष संघ गुरुवारी बलाढय़ जर्मनीशी कांस्यपदकाची लढत खेळणार आहे. दडपणाखाली बचाव फळीने १४ पेनल्टी कॉर्नर प्रतिस्पर्धी संघाला बहाल केल्यामुळे मंगळवारी उपांत्य फेरीत भारतीय संघ जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावरील बेल्जियमकडून २-५ अशा फरकाने पराभूत झाला. आठ ऑलिम्पिक सुवर्णपदके जिंकणाऱ्या भारताने १९८०च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये अखेरचे पदक जिंकले होते. परंतु बेल्जियमविरुद्धच्या चुका टाळून रिओ ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेत्या जर्मनीला टक्कर दिल्यास भारताला पदकाचे स्वप्न साकारता येईल. रुपिंदर पाल सिंग, हरमनप्रीत सिंग, वरुण कुमार आणि अमित रोहित यांच्यासारखे जगातील चार सर्वोत्तम ड्रॅग-फ्लिकर संघात असतानाही पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करण्यात भारताची कामगिरी समाधानकारक नाही.