आगामी टोकियो ऑलिम्पिकमध्ये भाग घेणाऱ्या भारतीय स्पर्धकांबद्दल विचार केला तर खेळाडू, प्रशिक्षक, क्रीडा अधिकाऱ्यांचे चित्र त्यांच्या मनात येईल. पण तुम्हाला माहीत आहे का, की यावेळी एक घोडीसुद्धा टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
दाजरा-४ असे या घोडीचे नाव असून ती ऑलम्पिकमध्ये भारतीय घोडेस्वार फवाद मिर्झासोबत असेल. २०११ मध्ये जन्मलेली दाजरा ही जर्मन बे होलस्टेनर जातीची घोडी आहे. तिचा रंग तपकिरी आहे. आतापर्यंत ती २३ स्पर्धा खेळली आहे, आणि त्यात ती पाचवेळा जिंकली आहे.

फवादला स्पॉन्सर करणाऱ्या एका ग्रुपने या घोडीला २०१९मध्ये खरेदी केले होते. यासाठी त्यांना २,७५,००० युरो (सुमारे दोन कोटी ४३ लाख रुपये) द्यावे लागले. या ग्रुपने फवादसाठी आणखी तीन घोडे खरेदी केले होते. यापैकी दाजरा-४ आणि सेनूर मेडिकॉट ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले. दोन्ही घोड्यांची सध्याची कामगिरी पाहता फवादने टोकियो ऑलिम्पिकमध्ये दाजराबरोबर सोबत खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

 

हेही वाचा – सचिन तेंडुलकरचा मुलगा महेंद्रसिंह धोनीला हवीय शिक्षकाची नोकरी!

घोडे असणार क्वारंटाइन

बंगळुरूमध्ये जन्मलेला आणि तिथेच लहानाचा मोठा झालेला फवाद २९ वर्षांचा आहे. आजकाल तो उत्तर-पश्चिम जर्मनीतील खेड्यात सराव करत आहे. तो दिवसातून सुमारे बारा तास घोड्यांसमवेत प्रशिक्षण घेत असतो. फवाद आणि दाजरा लवकरच टोकियो ऑलिम्पिकसाठी रवाना होतील. इतर खेळाडू आणि अधिकाऱ्यांप्रमाणे घोडे देखील क्वारंटाइन असतील. म्हणून, फवाद आणि दाजरा टोकियोला पोहोचण्यापूर्वी आणि नंतर सात दिवस क्वारंटाइन राहतील.

२० वर्षांची प्रतीक्षा

दोन दशकांत प्रथमच एक घोडेस्वार ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत आहेत. फवादच्या आधी विंग कमांडर आय. जे. लांबा आणि इम्तियाज अनीस या घोडेस्वारांनी ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. विंग कमांडर आय. जे. लांबा यांनी १९९६च्या अटलांटा ऑलिम्पिकमध्ये प्रतिनिधित्व केले होते, तर इम्तियाज अनीस यांना २००० सिडनी ऑलिम्पिकमध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री मिळाली.