जपानची राजधानी टोकियो येथे आजपासून ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली आहे. करोनाव्हायरस साथीच्या आजारामुळे ऑलिम्पिक स्पर्धा एक वर्षासाठी तहकूब करण्यात आल्या. पण एका वर्षानंतर या स्पर्धा खेळल्या जात आहेत. आज या स्पर्धेचा उद्धाटन सोहळा अतिशय दिमाखात रंगला. टोकियो ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्याच्या मार्चपास्टमध्ये भारतीय तुकडी २१ व्या क्रमांकावर उतरली. यात २२ खेळाडू आणि ६ अधिकारी सहभागी झाले. या मार्चपास्टमध्ये ग्रीकचा पहिला क्रमांक होता.

सहा वेळा विश्वविजेती बॉक्सर एम.सी. मेरी कोम आणि पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग यांनी उद्घाटन सोहळ्यात भारतीय पथकाचे नेतृत्व केले. भारतीय पथकाच्या प्रवेशावेळी पंतप्रधान मोदींनी टाळ्या वाजवून संघाला प्रोत्साहन दिले. १२७ खेळाडूंसह २२८ सदस्यीय पथक टोकियो ऑलिम्पिकमध्ये पाठवण्यात आले आहे.

 

 

 

 

 

ऑलिम्पिकमध्ये प्रथमच ‘eSwatini’ देशातील खेळाडूंनी ऑलिम्पिक सोहळ्यात भाग घेतला. वास्तविक हा नवीन देश नाही. दक्षिण आफ्रिका स्थित स्वाझीलँड देशाचे हे नवीन नाव आहे. हे नवीन नाव २०१८मध्ये स्वीकारले गेले.

करोनामुळे ऑलिम्पिकमध्ये झाले मोठे बदल

करोनामुळे ऑलिम्पिकमध्ये बरेच मोठे बदल पाहायला मिळतील. खेळाडूंना या विषाणूच्या धोक्यापासून वाचवण्यासाठी एक अतिशय कठोर बायो बबल तयार केला गेला आहे. टोकियो ऑलिम्पिक प्रेक्षकांशिवाय रंगणार आहे. करोनाच्या महामारीमुळे खेळाडूंना दररोज १९ चाचणींमधून जावे लागेल. या चाचणीच्या अहवालाशिवाय कोणत्याही खेळाडूला मैदानावर प्रवेश मिळणार नाही. इतकेच नव्हे, तर एखाद्या खेळाडूने अंतिम फेरी गाठली असेल आणि त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला असेल तर त्याला पदकाच्या शर्यतीतून माघार घ्यावी लागेल.