Tokyo 2020 : ऐतिहासिक क्षण, पण सुवर्णपदकाची हुलकावणी; रवी दहियाला रौप्यपदक!

रवीने उपांत्य फेरीत कझाकिस्तानच्या सनायेव नुरिस्लामचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.

tokyo olympics 2020 ravi dahiya vs zaur uguev wrestling final match updates
रवी दहिया

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये एक रौप्य आणि तीन कांस्यपदके जिंकणाऱ्या भारताला सुवर्णपदकाचे वेध लागले होते. पुरुषांच्या फ्रीस्टाईल कुस्तीमध्ये ५७ किलो वजनी गटात रवीकुमार दहियाचा अंतिम सामना रशियन ऑलिंपिक कमिटीच्या जावूर युगुयेवशी झाला, पण युगुयेवने आपला अनुभव पणाला लावत ही लढत ७-४ने जिंकली. रवीला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले असून भारताच्या खात्यात अजून एका पदकाची नोंद झाली आहे. रवीने उपांत्य फेरीत कझाकिस्तानच्या सनायेव नुरिस्लामचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. रवीला हा विजय फॉल रूलद्वारे मिळाला. म्हणजे त्याने नूरिस्लामला सामन्यातूनच बाहेर फेकले होते.

हेही वाचा – “क्रिकेटच्या तिन्ही वर्ल्डकपपेक्षा…”, हॉकी संघाचं कौतुक करत गंभीरनं जिंकली देशवासियांची मनं!

रवी आणि युगुयेव दोन्ही उत्कृष्ट फॉर्ममध्ये

रवी आणि युगुयेवे दोघेही सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये होते. यापूर्वी या दोघांची भेट २०१९च्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये झाली होती. त्यानंतर रशियन पैलवानाने भारतीय कुस्तीपटूला चुरशीच्या सामन्यात ६-४ने पराभूत केले. या स्पर्धेत रवीला कांस्यपदक मिळाले. रवीने २०२० आणि २०२१ आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले. त्याचबरोबर त्याने २०१८ च्या अंडर-२३ चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक जिंकले.

युगुयेव सर्वोत्तम कुस्तीपटूंपैकी एक

द्वितीय मानांकित युगुयेवने २०१८ आणि २०१९ वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकली. त्याला रशियन ऑलिंपिक कमिटीच्या सर्वोत्तम कुस्तीपटूंपैकी एक मानले जाते. त्याने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत १५ आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये १४ पदके जिंकली आहेत. यापैकी १२ सुवर्णपदके आहेत. मात्र, टोक्यो ऑलिम्पिकमध्ये त्याला काही कठीण सामन्यांना सामोरे जावे लागले. उपांत्य फेरीत त्याने इराणच्या रझा अत्रिनाघर्चीनीचा सहज पराभव केला.

भारताकडे आता कुस्तीमध्ये ६ ऑलिम्पिक पदके

कुस्तीपटू सुशील कुमारने भारताला ऑलिम्पिकमध्ये सलग दोन पदके जिंकून दिली होती. सुशीलने २००८च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक आणि २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकले. रवीच्या आधी भारताने कुस्तीमध्ये ५ पदके जिंकली आहेत. सुशीलव्यतिरिक्त योगेश्वर दत्तने २०१२मध्ये कांस्य, २०१६च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये साक्षी मलिकने कांस्य जिंकले. खाशाबा जाधव ऑलिम्पिक कुस्तीमध्ये पदक जिंकणारे भारताचे पहिला कुस्तीपटू होते. १९५२च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये त्यांनी ही कामगिरी केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Tokyo olympics 2020 ravi dahiya vs zaur uguev wrestling final match updates adn

ताज्या बातम्या