Tokyo Olympics 2020 Women’s Hockey: कधी, कुठे आणि कसा पाहता येणार भारत विरुद्ध अर्जेंटिना सामना?

१९८० मध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत महिला हॉकीचा प्रथमच समावेश करण्यात आला. त्यावेळी भारतीय संघाने चौथे स्थान पटकावलेलं. त्यानंतरही ही सर्वोत्तम कामगिरी

India vs Argentina live telecast
भारतीय महिला संघाच्या कामगिरीकडे सर्वाचेच लक्ष लागून राहिलं आहे. (फोटो ट्विटरवरुन साभार)

टोक्यो ऑलिम्पिकची प्रथमच उपांत्य फेरी गाठून भारतीय महिला संघाने आधीच इतिहास घडवला आहे. आज होणाऱ्या सामन्यामध्ये अर्जेंटिनाला नमवून अंतिम फेरीचे ‘सुवर्णलक्ष्य’ महिला संघापुढे आहे. १८ निर्भीड महिला हॉकीपटूंनी सोमवारी तीन वेळा ऑलिम्पिक विजेत्या ऑस्ट्रेलियाला १-० असा अनपेक्षित धक्का दिला. सामन्याच्या २२ व्या मिनिटाला मिळालेल्या एकमेव पेनल्टी कॉर्नरचे ड्रॅग-फ्लिकर गुर्जित कौरने गोलमध्ये रूपांतर करीत जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावरील ऑस्ट्रेलियाचे आव्हान संपुष्टात आणले. ४१ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर भारतीय महिला हॉकी संघाने प्रथमच हा पराक्रम केला. आजच्या उपांत्य फेरीत राणी रामपालच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय शिलेदारांसमोर अर्जेंटिनाचे कडवे आव्हान असेल.

नक्की पाहा हे फोटो >> भारतीय महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकांचं एका महिन्याचं मानधन पाहून चक्रावून जाल

मॉस्को येथे १९८० मध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत महिला हॉकीचा प्रथमच समावेश करण्यात आला. त्या वेळी भारताने सहा संघांपैकी चौथे स्थान प्राप्त केले होते. यंदा मात्र एकंदर तिसऱ्या ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या भारतीय महिलांनी एक पाऊल पुढे टाकले. त्यांना २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये १२व्या स्थानी समाधान मानावे लागले होते. १९८० नंतरची ही भारतीय महिला संघाची सर्वोत्तम कामगिरी आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धचा ऐतिहासिक विजयाने आत्मविश्वास वाढला…

जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या ऑस्ट्रेलियाने गटसाखळीत सर्व सामने जिंकून दिमाखात उपांत्यपूर्व फेरी गाठल्याने त्यांचेच पारडे साहजिकपणे जड मानले जात होते. मात्र प्रत्यक्षात भारतीय महिलांनी सुरुवातीपासूनच दडपण झुगारून खेळ केला. पहिले सत्र गोलशून्य बरोबरीत सुटल्यानंतर दुसऱ्या सत्रात भारताने चेंडूवर अधिक ताबा राखला. याचाच लाभ उचलत २२व्या मिनिटाला मिळालेल्या सामन्यातील एकमेव पेनल्टी-कॉर्नरच्या बळावर गुरजितने अप्रतिम गोल झळकावला आणि भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली.

नक्की पाहा हे फोटो >> “सरकार त्याचं लग्न होऊ देणार नाही”; ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकणाऱ्या खेळाडूच्या आईला मुलाच्या संसाराची चिंता

तिसऱ्या आणि चौथ्या सत्रात ऑस्ट्रेलियाने सातत्याने भारताच्या गोलजाळ्यावर हल्ले केले. मात्र आतापर्यंत स्पर्धेत सुमार कामगिरी करणारी भारताची गोलरक्षक सविता पुनिया या वेळी ऑस्ट्रेलियाच्या मार्गात भिंत बनून उभी ठाकली. ऑस्ट्रेलियाला तब्बल आठ पेनल्टी-कॉर्नर मिळूनही एकदाही तिचा बचाव भेदता आला नाही आणि त्यांच्यावरील दडपणात सातत्याने वाढ झाली. अखेर पंचांनी सामना संपल्याची शिटी वाजवताच भारतीय खेळाडूंच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले आणि प्रशिक्षक शोर्ड मरिन यांच्यासह सर्वांनी मैदानावर रिंगण घालून अनोख्या प्रकारे जल्लोष केला. य़ा विजयामुळे भारतीय महिला संघाचा आत्मविश्वास नक्कीच वाढला असून आजही अशीच कामगिरी केल्यास भारत अंतिम फेरीत धडक मारेल.

कधी आहे सामना :

भारत विरुद्ध अर्जेंटिना हा सामना भारतीय वेळेनुसार आज दुपारी साडेतीन वाजता सुरु होणार आहे.

कोणत्या खेळाडूंवर असणार नजर :

राणी रामपालच्या नेतृत्वाखालील भारताच्या बचावाची भिस्त गोलरक्षक सविता पुनियासह गुर्जित, दीप ग्रेस इक्का, मोनिका आणि उदिता यांच्यावर आहे.

नक्की पाहा हे फोटो >> ४५.९४ सेकंदांचा खेळ सारा… जगभरात व्हायरल होणाऱ्या या खेळाडूच्या फोटोंमागील तीन कारणं जाणून घ्या

कुठे खेळवला जाणार हा सामना :

भारत आणि अर्जेंटिनादरम्यानचा हा सामना ओई हॉकी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

कुठे पाहता येणार :

सोनी टेन १ एचडी/एसडी, सोनी टेन २ एचडी/एसडी आणि सोनी टेन ३ एचडी/एसडी या वाहिन्यांवर हा सामना लाइव्ह पाहता येईल.

ऑनलाइन कुठे पाहता येणार सामना :

हा सामना ऑनलाइन माध्यमातून सोनी लिव्ह अ‍ॅपवर पाहता येणार आहे. तसेच सामन्याचे सर्व अपडेट्स loksatta.com वरही उपलब्ध असतील.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Tokyo olympics 2020 when and where to watch india vs argentina live telecast on tv and online in india scsg

Next Story
रसिका , सारा , सुधांशु, आदित्य यांची विजयी सलामी
ताज्या बातम्या