आता लक्ष पॅरिसकडे!

टोक्यो ऑलिम्पिक स्पध्रेची यशस्वी सांगता; समारोप कार्यक्रमाचे दिमाखदार आयोजन

टोक्यो ऑलिम्पिक स्पध्रेची यशस्वी सांगता; समारोप कार्यक्रमाचे दिमाखदार आयोजन

टोक्यो : करोनाचे आव्हान यशस्वीपणे पेलून मागील १७ दिवस जगभरातील क्रीडारसिकांचे निखळ मनोरंजन केल्यानंतर रविवारी टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचा समारोप सोहळा धडाक्यात संपन्न झाला. जपानमधील संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या या सोहळ्यात २०२४मध्ये पॅरिसला पुन्हा भेटू, असा संदेश देत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे (आयओसी) अध्यक्ष थॉमस बाख यांनी चाहत्यांचे आभार मानले.

उद्घाटन सोहळ्याप्रमाणेच नॅशनल स्टेडियमवर झालेल्या समारोप सोहळ्यातही फटाक्यांची आतषबाजी आणि भव्यदिव्य रोषणाईने सर्वाच्या डोळ्यांचे पारणे फेडले. करोनामुळे वर्षभराने लांबणीवर पडलेल्या या स्पर्धेच्या आयोजनावर यंदाही असंख्य प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्यामुळे सोहळ्याच्या सुरुवातीला गेल्या वर्षभरातील घडामोडींचा आणि स्पर्धेच्या तयारीचा धावता आढावा घेणारी चित्रफीत दाखवण्यात आली. त्यानंतर गेल्या १७ दिवसांत क्रीडापटूंच्या यशापयशाच्या प्रसंगातील विविध भावनांचीही एक झलक दाखवण्यात आली. जपानच्या राष्ट्रगीताद्वारे अन्य कार्यक्रमांना प्रारंभ झाला. मग सर्व देशांच्या क्रीडापटूंनी संचलन केले. भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनिया समारोप सोहळ्यासाठी ध्वजवाहकाच्या भूमिकेत होता.

यंदा घरातूनच आपापल्या देशातील खेळाडूंना पाठिंबा दर्शवणाऱ्या चाहत्यांना मोठय़ा स्क्रीनवर दाखवण्यात आले. विविध खेळांची प्रात्यक्षिके आणि तसेच गायन-वाद्यांचे कार्यक्रमही या वेळी झाले. त्यापुढे प्रत्येक देशातील क्रीडापटूंनी संचलनासह स्टेडियममध्ये प्रवेश केला. खेळाडूंमध्ये या वेळी प्रचंड उत्साह दिसून आला. काहींना सेल्फीचा मोह आवरला नाही, तर काहींनी गाण्याच्या तालावर ठेकाही धरला.

पॅरिसमधील आयफेल टॉवरजवळ जमा झालेल्या जनसमुदायाकडे आभासी स्वरूपात पुढील ऑलिम्पिकची सूत्रे सोपवली. टोक्योच्या गव्हर्नर युरिको कोईके यांच्याकडून पॅरिसचे महापौर अ‍ॅने हिडाल्गो यांच्याकडे ऑलिम्पिक ध्वज सोपवण्यात आला. या वेळी जपानचे पंतप्रधान योशिहिडे सुगा, संयोजन समितीच्या अध्यक्ष सेईको हाशिमोटो, जपानचा राजपुत्र अकिशिनो, आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती. शेवटी बाख यांनी सर्वाचे आभार मानतानाच ऑलिम्पिकच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजकांचे कौतुक केले. मग ऑलिम्पिक ज्योत विझवून २४ ऑगस्टपासून रंगणाऱ्या टोक्यो पॅरालिम्पिकलाही सर्वानी तितकाच प्रतिसाद द्यावा, असे आवाहन बाख यांनी केले. त्यानंतर ‘आरिगातो’ (धन्यवाद) असा शब्द लिहिलेले फुगे हवेत सोडून सोहळा संपवण्यात आला.

वेटलिफ्टिंग वगळणार?

’ टोक्यो : ऑलिम्पिकमधून क्रीडा प्रकाराला वगळण्यासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (आयओसी) अधिकारात रविवारी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे संघटनात्मक वादांमुळे २०२४च्या पॅरिस ऑलिम्पिकमधून वेटलिफ्टिंगला वगळण्याची दाट शक्यता आहे. ‘आयओसी’ला बॉक्सिंग आणि वेटलिफ्टिंग क्रीडा प्रकारांमधील वादाला यंदा सामोरे जावे लागले. त्यामुळे ‘आयओसी’ला कोणत्याही क्रीडा प्रकारचे पूर्ण सदस्यत्व रद्द करण्याचे अधिकार बहाल करण्यात आले आहे.

किपचोगेचे पुन्हा वर्चस्व

’ सापोरो : केनियाच्या ३६ वर्षीय एल्युड किपचोगेने पुन्हा ऑलिम्पिक मॅरेथॉनवर वर्चस्व गाजवले. रविवारी दमट वातावरणात झालेल्या या स्पध्रेत किपचोगेने २ तास, ८ मिनिटे, ३८ सेकंदांची वेळ नोंदवत हे यश मिळवले. नेदरलँड्सच्या उपविजेत्या अबदी नागीयेपेक्षा ८० सेकंदांच्या फरकाने किपचोगेने हे सुवर्णपदक पटकावले, तर बेल्जियमच्या बशिर अबदीने कांस्यपदकाची कमाई केली. पुरुषांच्या मॅरेथॉनमध्ये दोन ऑलिम्पिक सुवर्णपदके पटकावणारा किपचोगे हा तिसरा धावपटू ठरला आहे.

जपानची विक्रमी पदककमाई

’ टोक्यो : करोना साथीमुळे वर्षभराच्या दिरंगाईने झालेल्या टोक्यो ऑलिम्पिकमुळे खर्चाचा आकडा वाढल्याने जपानमध्ये नागरिकांचा रोष निर्माण झाला आहे; परंतु ऑलिम्पिकसारख्या प्रतिष्ठेच्या स्पध्रेतील विक्रमी पदककमाईमुळे जपानला दिलासाही मिळाला आहे. जपानने २७ सुवर्णपदकांसह एकूण ५८ पदके कमावताना अमेरिका आणि चीन यांच्यानंतर तिसरा क्रमांक प्राप्त केला आहे. जपानने याआधी सर्वाधिक १६ सुवर्णपदकांची कमाई १९६४च्या टोक्यो आणि २००४च्या अ‍ॅथेन्स ऑलिम्पिकमध्ये केली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Tokyo olympics 2021 closing ceremony tokyo olympics come to a successful conclusion zws