‘गोल्डन पंच’ची सर्वात मोठी आशा असलेल्या भारताच्या अमित पांघलचा प्रवास टोकियो ऑलिम्पिकमध्ये संपला आहे. पुरुषांच्या फ्लाईवेटमध्ये जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानी असलेला अमित उपांत्यपूर्व फेरीचा अडथळा पार करू शकला नाही. राऊंड १६ मध्ये त्याला कोलंबियाच्या रिओ ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता हर्नी रिवास मार्टिनेझने ४-१ने पराभूत केले. आपल्या पदकाचा रंग बदलण्यासाठी टोक्योत आलो असल्याचे कोलंबियन बॉक्सरने दाखवून दिले.

संपूर्ण सामन्यात अमित अधिक बचाव करताना दिसला. दुसऱ्या फेरीत अमित बहुतेक वेळा दोरीजवळ दिसला. अमितला मार्टिनेझवर आघाडी घेण्याची संधी मिळाली नाही. कोलंबियाच्या या बॉक्सरने त्याला तशी संधीच दिली नाही. मार्टिनेझने २८-२९, २९-२७, ३०-२७, २९-२८, २९-२८ अशी ही लढत जिंकली.

 

पहिल्या फेरीच्या सुरुवातीला अमित मार्टिनेझवर वर्चस्व गाजवताना दिसला. पण विरोधी खेळाडूने लवकरच सामन्यावर ताबा मिळवला. पहिल्या फेरीत त्याने अमित पांघलला अनेक वेळा दोरीवर आणले. मात्र, अमितनेही  जोरदार बॅकहँड पंचने पुनरागमन केले. पहिल्या फेरीत चार पंच अमितच्या बाजूने होते.

दुसऱ्या फेरीत कोलंबियाच्या बॉक्सरने अमितचा बचाव मोडून काढण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र, नंतर त्याने चेहऱ्यावर काही चांगले ठोसे लगावले. दुसऱ्या फेरीत चार पंचांनी मार्टिनेझच्या बाजूंनी निकाल दिला. तिसऱ्या फेरीत, अमितने बॅकफूटवर क्रॉस पंच करण्याचा प्रयत्न केला, परंतु मार्टिनेझने स्वीप करून राइट हुक दिला. अमितचे माउथ गार्ड बाहेर आले होते. अमित या फेरीत ब्लॉक करताना दिसला. मार्टिनेझने या फेरीत पूर्णपणे वर्चस्व गाजवले आणि पाचही पंचांनी त्याच्या बाजूने निकाल दिला.