Tokyo 2020: “मी दोन दिवस काहीच खाल्लं नव्हतं”; मिराबाई चानूने केला खुलासा

टोक्यो ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती वेटलिफ्टिंगपटू मिराबाई चानू मायदेशी परतली आहे

Tokyo Olympics, Silver Medalist, Mirabai Chanu,
टोक्यो ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती वेटलिफ्टिंगपटू मिराबाई चानू मायदेशी परतली आहे (File Photo- AP)

Tokyo Olympics: टोक्यो ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती वेटलिफ्टिंगपटू मिराबाई चानू मायदेशी परतली आहे. नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर तिचं अत्यंत ज्ललोषात स्वागत करण्यात आलं. मिराबाईचे स्वागत करण्यासाठी चाहत्यांनी तुफान गर्दी केली होती. मिराबाईने यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपल्या प्रवासाबद्दल तसंच तयारीबद्दल सांगितलं. यावेळी एनडीटीव्हीशी बोलताना तिने ऑलिम्पिकच्या दोन दिवस आधी आपण काही खाल्लं नव्हतं अशी माहिती दिली. वजन वाढण्याची भीती असल्याने आपण काहीच खाल्ल नव्हतं असं तिने सांगितलं आहे.

Tokyo 2020: मिराबाई चानूला सुवर्णपदक मिळणार?

मणिपूरच्या २६ वर्षीय चानूने शनिवारी महिलांच्या ४९ किलो वजनी गटात रौप्यपदकावर नाव कोरून भारताचे यंदाच्या ऑलिम्पिकमधील पदकांचे खाते उघडले. ‘ऑलिम्पिक पदकासह भारतात परतल्यामुळे मी फार आनंदित आहे. तुम्ही सर्वाकडून लाभलेले प्रेम आणि पाठिंब्यासाठी धन्यवाद!’ असे ‘ट्वीट’ मिराबाईने मायदेशी परतल्यावर केले. मिराबाईच्या स्वागतावेळी विमानतळाबाहेरील चाहत्यांनी ‘भारतमाता की जय, देशाची शान मिराबाई चानू’ अशा घोषणा दिल्या. या वेळी भारतीय क्रीडा प्राधिकरणचे सदस्य, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

मिराबाईचे जल्लोषात स्वागत!

“मी दोन दिवस काहीच खाल्लं नाही कारण मला माझ्या वजनाची चिंता होती,” असं सांगताना रौप्यपदक विजेच्या मिराबाई चानूने कडक डाएट पाळण्यामुळे आपल्याला कशा पद्दतीने प्रेरणा मिळाली आणि रिओ ऑलिम्पिकमध्ये मिळालेल्या अपयशानंतर याचा कसा फायदा झाला याबद्दल सांगितलं.

४९ किलो वजनी गटात रौप्यपदक मिळवणाऱ्या मिराबाईने यावेळी वजनावर नियंत्रण ठेवताना येणाऱ्या अडचणींबद्दल सांगितलं. “हे फार कठीण आहे. आम्हाला वजन वाढू नये यासाठी फार कडक डाएट पाळावा लागतो. यामुळे मी जंक फूड खाऊ खकत नाही. मर्यादित गोष्टींचंच सेवन करु शकत होते,” असं मिराबाईने यावेळी सांगितलं.

एका जिद्दीची कहाणी!

रिओ ऑलिम्पिकमध्ये मिळालेल्या अपयशानंतर मिराबाईने भारतासाठी सुवर्णपदक जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला होता. यासंबंधी बोलताना तिने सांगितलं की, “मला रिओ ऑलिम्पिकदरम्यान आत्मविश्वास मिळाला. रिओमध्ये निराशा झाल्यानंतर यापुढे ज्या कोणत्या स्पर्धेत सहभागी होऊ तिथे भारतासाठी पदक जिंकायचं असं मी ठरवलं होतं. मी माझी सर्वोत्कृष्ट कामगिरी करणं गरजेचं होतं”.

“माझे प्रशिक्षक विजय शर्मा यांनी मला फार पाठबळ दिलं आणि रिओमध्ये जे काही झालं आहे ते विसरुन भविष्यासाठी तयारी करण्याचा सल्ला दिला. त्यांच्यामुळेच आज मी इथपर्यंत पोहोचले आहे,” असं मिराबाईने यावेळी सांगितलं.

अतिरिक्त पोलीस अधीक्षकपदी नेमणूक

ऑलिम्पिकमधील ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या मिराबाईची अतिरिक्त पोलीस अधीक्षक (क्रीडा) या पदावर नेमणूक करण्यात आली असून तिला राज्य शासनाकडून तब्बल एक कोटी रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांनी याविषयी अधिकृतरीत्या घोषणा करतानाच मिराबाईचे कौतुकही केले.

पिझ्झावर ताव मारला!

’ दोन दिवसांपूर्वी रौप्यपदक मिळाल्यानंतर मिराबाईने पिझ्झा खाण्याची इच्छा व्यक्त केली होती. अखेर रविवारी तिला पिझ्झावर ताव मारण्याची संधी मिळाली. ‘‘पिझ्झा माझ्या आवडीचा आहे. ऑलिम्पिकनगरीत दाखल झाल्यापासून येथे पिझ्झा मिळत असल्याचे मला समजले. त्यामुळे आता पदकाचा आनंद पिझ्झा खाऊन करणार आहे,’’ असे मिराबाई म्हणाली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Tokyo olympics didnt eat anything for two days before competition says silver medallist mirabai chanu sgy