भारतीय नेमबाजांकडून सलग चौथ्या दिवशी निराशा * मिश्र दुहेरीच्या पात्रता फेरीत चारही जोडय़ा अपयशी

टोक्यो : टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत सलग चौथ्या दिवशी भारतीय नेमबाजांनी निराशाजनक कामगिरी केली. मंगळवारी पिस्तूल आणि रायफल प्रकाराच्या मिश्र स्पर्धामध्ये अपेक्षाभंग करीत भारताच्या चारही जोडय़ांनी पात्रता फेरीचा अडथळाही ओलांडला नाही.

भारताला पदकाच्या सर्वाधिक अपेक्षा असलेल्या सौरभ चौधरी आणि मनू भाकर जोडीने १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत दडपणाखाली खेळ करीत पात्रता फेरीतच गाशा गुंडाळला. असाका नेमबाजी केंद्रावर झालेल्या स्पर्धेत पहिल्या टप्प्यात ५८२ गुण मिळवत अव्वल ठरलेल्या सौरभ-मनू जोडीला दुसऱ्या पात्रता टप्प्यात सातवे स्थान मिळाले. पात्रतेच्या दुसऱ्या टप्प्यात सौरभ-मनू जोडीने प्रत्येकी दोन मालिकांमध्ये एकूण ३८० गुण मिळवले. या फेरीत मनूने खराब सुरुवात करताना पहिल्या मालिकेत ९२ आणि दुसऱ्या मालिकेत ९४ गुण कमावले. पण सौरभने पहिल्या मालिकेत ९६ आणि दुसऱ्या मालिकेत ९८ गुण प्राप्त करीत एकूण गुण वाढवण्याचा प्रयत्न केला.

या स्पर्धा प्रकारात सहभागी झालेल्या अभिषेक वर्मा आणि यशस्विनी सिंह देस्वाल या आणखी एका भारतीय जोडीला पात्रतेच्या पहिल्या टप्प्यात ५६४ गुण मिळाले. त्यामुळे १७व्या स्थानासह त्यांची वाटचाल खंडित झाली.

त्यानंतर, १० मीटर एअर रायफल मिश्र सांघिक गटात भारताच्या दोन्ही जोडय़ा पहिल्या पात्रता टप्प्यातच पराभूत झाल्या. ईलाव्हेनिल व्हालारिव्हान आणि दिव्यांश सिंह पन्वार यांनी प्रत्येकी तीन मालिकांनंतर ६२६.५ गुण मिळवत १२वा क्रमांक मिळवला. तर अंजूम मुदगिल आणि दीपक कुमार जोडीने ६.२३.८ गुणांसह १८वा क्रमांक मिळवला. या स्पर्धेत २९ जोडय़ा सहभागी झाल्या होत्या.

नेमबाजांवर चौफेर टीका; प्रशिक्षकांवर टांगती तलवार

टोक्यो : भारताच्या १५ सदस्यीय नेमबाजी चमूवर ऑलिम्पिकमधील खराब कामगिरीमुळे चौफेर टीका होत आहे. या पाश्र्वभूमीवर नेमबाजांच्या आणि प्रशिक्षकांच्या कामगिरीचा आढावा घेतला जात आहे, असे संकेत भारतीय नेमबाजी संघटनेने  दिले आहेत. हा नेमबाजीचा चमू  सध्या गटबाजीसह अनेक मुद्दय़ांमुळे चर्चेत आहे.

भारतीय नेमबाजांना सलग चौथ्या दिवशीही पदकाचे खाते उघडण्यात अपयश आले. २०१६च्या रिओ ऑलिम्पिकप्रमाणेच भारतीय नेमबाज अपयशी ठरत असल्याने मार्गदर्शकांच्या कामगिरीचा आढावा घेण्यात येणार आहे.

रायफल आणि पिस्तूल नेमबाज मिश्र सांघिक गटात पात्रता फेरीत गारद झाल्यानंतर नेमबाजी चाहत्यांची घोर निराशा झाली. विश्वचषक नेमबाजी स्पर्धाच्या कामगिरीची ऑलिम्पिक स्पध्रेत पुनरावृत्ती करण्यात भारतीय नेमबाज का अपयशी ठरत आहेत, हा प्रश्न समाजमाध्यमांवर विचारला जात आहे. कनिष्ठ राष्ट्रीय प्रशिक्षक जसपाल राणा यांच्याशी मतभेद झाल्यामुळे संघटनेने रोनक पंडितला तिच्या मार्गदर्शनासाठी नेमले होते.

पाच वर्षांपूर्वी रिओ ऑलिम्पिक स्पध्रेतील खराब कामगिरीनंतर नेमबाजी संघटनेने ऑलिम्पिक पदकविजेत्या अभिनव बिंद्राच्या नेतृत्वाखाली समिती नेमली होती. या समितीच्या सुधारणांची अंमलबजावणी करून भारताने टोक्यो ऑलिम्पिकसाठी कामगिरी उंचावण्याची योजना आखली होती.

‘‘सध्या तरी आपण भारतीय संघाला पाठबळ देऊया. ते उत्तम निकाल देतील, अशी मला आशा आहे. मग स्पध्रेनंतर कामगिरीचा पूर्ण आढावा घेऊ,’’ असे भारतीय नेमबाजी संघटनेचे अध्यक्ष रणिंदर सिंग म्हणाले.

मानहानीकारक कामगिरी असेच आता म्हणावे लागेल. भारतीय नेमबाजी संघाकडून सर्वाधिक अपेक्षा होत्या. या कामगिरीबाबत नशिबाला दोष देणे योग्य ठरणार नाही. माझ्यासह सर्वाचीच निराशा झाली आहे. नेमबाजसुद्धा निराश आहेत. परंतु समाजमाध्यमांवर त्यांना आणखी अपमानित करू नये. काही जण अपयशी ठरल्यामुळे त्यांच्यावर टीका होते आहे. परंतु क्रीडापटूच्या आयुष्याचा हा अविभाज्य भाग असतो. बंदूक, बॉल किंवा रॅकेट या बळावर नव्हे, तर मानसिक सामर्थ्यांच्या बळावर ऑलिम्पिक पदक जिंकता येते. त्यामुळे आत्मपरीक्षण हे महत्त्वाचे असते.

-जॉयदीप कर्माकर, माजी आंतरराष्ट्रीय नेमबाज

भारतीय नेमबाजांची कामगिरी निश्चितच अपेक्षेनुसार झालेली नाही. त्यामुळे प्रशिक्षक आणि साहाय्यक मार्गदर्शकांच्या कामगिरीचा आम्ही आढावा घेत आहोत. आवश्यकता भासल्यास त्यांच्यात बदलही करण्यात येईल. ऑलिम्पिकसारख्या प्रतिष्ठेच्या स्पध्रेला सामोरे जाताना भारतीय नेमबाजांमध्ये कसली तरी उणीव भासते आहे. भारतीय चमूत गुणवत्तेची मुळीच कमी नाही.

– रणिंदर सिंग, भारतीय नेमबाजी संघटनेचे अध्यक्ष

१० मीटर मिश्र सांघिक स्पर्धामध्ये भारतीय नेमबाजांनी निराश केली. सौरभने उत्तम कामगिरी केली, परंतु मनूने कामगिरी उंचावण्याची आवश्यकता होती. पण अखेरीस भारताची कामगिरी निराशाजनक ठरली.

-हीना सिधू, आंतरराष्ट्रीय नेमबाज.