भारताच्या महिला हॉकी संघाला बुधवारी पराभवाचं तोंड पहावं लागलं. ग्रेट ब्रिटनच्या संघाने भारतीय महिला संघाचा ४-१ च्या फरकाने पराभव केला. या पराभवामुळे भारताचा पुढील फेरीत जाण्याचा मार्ग आणखीन खडतर झालाय. आता भारतीय महिला संघाला त्यांचे पुढील दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागणार आहेत. भारतीय संघाचे पुढील सामने आयर्लण्ड आणि रिपब्लिक ऑफ साऊथ आफ्रिका संघाविरुद्ध होणार आहेत. आजच्या पराभवामुळे भारताची गोल्सची संख्या उणे ९ इतकी झालीय. शर्मिला देवीने पेनल्टी कॉर्नरच्या संधीचे गोलमध्ये रुपांतर करत आजच्या सामन्यात भारतातर्फे एकमेव गोल केला. ग्रेट ब्रिटनसाठी हान मार्टीनने दोन तर लिली ओस्ले आणि ग्रेस बाल्सडोनने प्रत्येकी एक असे एकूण चार गोल नोंदवले.

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला संघाचा हा सलग तिसरा पराभव आहे. ओआय हॉकी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यामध्ये भारतीय संघ ग्रेट ब्रिटनच्या संघासमोर अगदीच दुबळा वाटला. सामना सुरु झाल्यानंतर ७५ व्या सेकंदाला ग्रेट ब्रिटनने आपला पहिला गोल केला. त्यानंतर भारताला गोल करण्याच्या काही संधी निर्माण झाल्या मात्र त्यात संघाला यश आलं नाही. ब्रिटनच्या संघाची बचाव फळी फारच मजबूत असल्याने भारतीय महिला खेळाडू गोंधळताना दिसल्या. दुसऱ्या क्वार्टरमध्ये मार्टीनने संघासाठी दुसरा गोल केला. मार्टीनने पहिल्यांदा गोल करण्याचा प्रयत्न भारतीय गोलकीपर असणाऱ्या सविताने योग्य पद्धतीने आडवला मात्र दुसऱ्या प्रयत्नात मार्टीन हिला यश आलं. या गोलनंतर सहाव्या मिनिटामध्ये भारताने आपला सामन्यातील एकमेव गोल नोंदवला. गुरजीत कौरने हा गोल केला.

सामन्याच्या उत्तरार्धामध्ये भारताला एकही गोल करता आला नाही. तर ब्रिटनने एक गोल नोंदवत भारतावर ४-१ च्या फरकाने विजय मिळवला. यापूर्वी भारताला सोमवारी जर्मनीने २-० ने पराभूत केलं. तर त्याआधी नेदरलॅण्डने रविवारच्या सामन्यात भारताला पराभूत केल होतं. आता भारताचा सामना ३० जुलै रोजी आयर्लण्डसोबत तर ३१ जुलै रोजी दक्षिण आफ्रिकेसोबत होणार आहे. २ ऑगस्टपासून बाद फेरी सुरु होणार आहे.

पुरुष सांघाची काय स्थिती?

ड्रॅगफ्लिकर रुपिंदर पाल सिंगच्या दोन गोलच्या बळावर भारताच्या पुरुष हॉकी संघाने मंगळवारी स्पेनला ३-० असे नमवून उपांत्यपूर्व फेरीची दावेदारी मजबूत केली आहे. याआधीच्या सामन्यात बलाढय़ ऑस्ट्रेलियाकडून १-७ अशी शरणागती पत्करणाऱ्या भारतीय संघाने जागतिक क्रमवारीत नवव्या क्रमांकावरील स्पेनविरुद्ध दिमाखदार कामगिरी बजावली. सिम्रनजीत सिंगने १४व्या मिनिटाला भारताचे खाते उघडले, तर रुपिंदरने १५व्या आणि ५१व्या मिनिटाला गोल करीत भारताला ‘अ’ गटातील तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून दिला. भारताची पुढील लढत गुरुवारी ऑलिम्पिक विजेत्या अर्जेटिनाशी होणार आहे.