बॉक्सिंग : लव्हलिना उपांत्यपूर्व फेरीत

महिलांच्या ६९ किलो वजनी गटातील रोमहर्षक उपउपांत्यपूर्व लढतीत लव्हलिनाने जर्मनीच्या नॅडीन आपेट्झवर ३-२ अशी सरशी साधली.

टोक्यो : भारताची युवा बॉक्सिंगपटू लव्हलिना बोर्गोहेनने कारकीर्दीतील पहिल्याच ऑलिम्पिकमध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठण्याची किमया साधली. महिलांच्या ६९ किलो वजनी गटातील रोमहर्षक उपउपांत्यपूर्व लढतीत लव्हलिनाने जर्मनीच्या नॅडीन आपेट्झवर ३-२ अशी सरशी साधली.

लव्हलिना टोक्यो ऑलिम्पिकमध्ये बॉक्सिंग क्रीडाप्रकारात उपांत्यपूर्व फेरी गाठणारी भारताची पहिलीच खेळाडू ठरली असून शुक्रवारी तिच्यासमोर चायनीज तैपईची माजी जगज्जेती निन-चीन चेनचे कडवे आव्हान असेल. लव्हलिनाने चेनला धूळ चारल्यास तिचे किमान कांस्यपदक सुनिश्चित होईल. बुधवारी बॉक्सिंगमध्ये पूजा राणी आपल्या अभियानाचा प्रारंभ करणार आहे.

बॅडमिंटन : विजयानंतरही चिराग-सात्त्विक स्पर्धेबाहेर

टोक्यो : भारतीय बॅडिमटनपटू चिराग शेट्टी आणि सात्त्विकसाईराज रंकीरेड्डीला गटातील अखेरची लढत जिंकूनही स्पर्धेबाहेर जावे लागले. चिराग-सात्त्विक जोडीने मंगळवारी क्रमवारीत १८व्या क्रमांकावरील इंग्लंडच्या बेन लेन आणि सीन व्हेन्डी जोडीला ४४ मिनिटांत २१-१७, २१-१९ अशा फरकाने हरवले. परंतु ‘अ’ गटात गुणानुक्रमे तिसरा क्रमांक मिळाल्यामुळे त्यांना बाद फेरी गाठण्यात अपयश आले.

टेबल टेनिस : शर्थीच्या झुंजीनंतर शरथ पराभूत

टोक्यो : शरथ कमलने मंगळवारी पुरुष एकेरीच्या तिसऱ्या फेरीत जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या चीनच्या मा लाँगला कडवी झुंज दिली. मात्र त्याला विजय मिळवण्यात अपयश आले. त्याच्या पराभवासह भारताचेही टेबल टेनिस क्रीडाप्रकारातील आव्हान संपुष्टात आले. रिओ ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या लाँगने शरथवर ११-७, ८-११, १३-११, ११-४, ११-४ अशी पाच गेममध्ये मात केली. लाँगने ४६ मिनिटांत ही लढत जिंकली. ३९ वर्षीय शरथची मात्र प्रथमच ऑलिम्पिकची उपउपांत्यपूर्व फेरी गाठण्याची संधी हुकली. पुरुषांमध्ये शरथपूर्वी ज्ञानशेखरन साथियनचे आव्हान दुसऱ्या फेरीतच संपुष्टात आले. तर महिलांमध्ये मनिका बत्रा आणि सुतिर्था मुखर्जी यांना अनुक्रमे तिसऱ्या आणि दुसऱ्या फेरीत गाशा गुंडाळावा लागला. मिश्र दुहेरीत शरथ-मनिका यांच्याकडून सर्वाना पदकाच्या अपेक्षा होत्या, परंतु त्यांना सलामीलाच पराभवाचा सामना करावा लागला.

हॉकी : भारताचा स्पेनवर विजय

टोक्यो :  ड्रॅगफ्लिकर रुपिंदर पाल सिंगच्या दोन गोलच्या बळावर भारताच्या पुरुष हॉकी संघाने मंगळवारी स्पेनला ३-० असे नमवून उपांत्यपूर्व फेरीची दावेदारी मजबूत केली आहे. याआधीच्या सामन्यात बलाढय़ ऑस्ट्रेलियाकडून १-७ अशी शरणागती पत्करणाऱ्या भारतीय संघाने जागतिक क्रमवारीत नवव्या क्रमांकावरील स्पेनविरुद्ध दिमाखदार कामगिरी बजावली. सिम्रनजीत सिंगने १४व्या मिनिटाला भारताचे खाते उघडले, तर रुपिंदरने १५व्या आणि ५१व्या मिनिटाला गोल करीत भारताला ‘अ’ गटातील तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून दिला. भारताची पुढील लढत गुरुवारी ऑलिम्पिक विजेत्या अर्जेटिनाशी होणार आहे.

शिडाच्या बोटींची शर्यत : विष्णू २२वा, नेत्रा ३३वी

इनोशिमा : शिडाच्या बोटींच्या स्पर्धेमधील सहा शर्यतींनंतर विष्णू सरवाननला २२व्या आणि नेत्रा कुमाननला ३३व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. पुरुषांच्या लेसर स्पर्धा प्रकारातील पाचव्या आणि सहाव्या शर्यतीत विष्णूने अनुक्रमे २३वा आणि २२वा क्रमांक मिळवला, तर महिलांच्या लेसर रॅडिअल प्रकारात नेत्राने ३२वा आणि ३८वा क्रमांक मिळवला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Tokyo olympics indian players performance in olympics today zws