टोक्यो : ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेली पहिली तलवारबाज सीए भवानी देवीची वाटचाल दुसऱ्या फेरीमध्ये खंडित झाली. महिलांच्या वैयक्तिक सॅब्रे प्रकारात जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या मनून ब्रुनेटविरुद्ध पराभवामुळे तिचे आव्हान संपुष्टात आले. २७ वर्षीय भवानीने पहिल्या फेरीत टय़ुनिशियाच्या नाडिया बेन अझिझीला १५-३ असे नामोहरम करीत आपल्या अभियानाला दिमाखात प्रारंभ केला; परंतु रिओ ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरी गाठणाऱ्या फ्रान्सच्या ब्रुनेटकडून ७-१५ अशा फरकाने तिने पराभव पत्करला.

मी माझा सर्वोत्तम खेळ दाखवण्याचा प्रयत्न केला; परंतु मी दुसऱ्या फेरीत पराभूत झाले, याबद्दल मी दिलगिरी प्रकट करते. तुम्हा सर्वाच्या पाठबळाच्या बळावर पुढील ऑलिम्पिकमध्ये अधिक खंबीरपणे उतरेन आणि यशस्वी होईन, अशी आशा आहे.

सीए भवानी देवी

तिरंदाजी : दक्षिण कोरियापुढे भारताचे तिरंदाज निष्प्रभ

’  टोक्यो : गेल्या तीन दिवसांच्या कालावधीत भारतीय तिरंदाजांना दुसऱ्यांदा दक्षिण कोरियाचा अडथळा ओलांडण्यात अपयश आले. सोमवारी झालेल्या पुरुषांच्या सांघिक प्रकारातील उपांत्यपूर्व फेरीत कोरियाने भारताचा ६-० असा फडशा पाडला.कोरियानेच मग अनुक्रमे जपान आणि चायनीज तैपई यांना धूळ चारून सुवर्णपदक पटकावले. अतानू दास, प्रवीण जाधव आणि तरुणदीप रॉय या तिघांचा समावेश असलेल्या भारतीय चमूने  उपउपांत्यपूर्व लढतीत कझाकस्तानवर ६-३ असा विजय मिळवला; परंतु कोरियाविरुद्ध मात्र त्यांचा निभाव लागला नाही. कोरियाच्या तिरंदाजांनी संपूर्ण सामन्यात एकूण १२ वेळा पूर्ण १० गुण मिळवले, तर कझाकस्तानविरुद्ध सहा वेळा १० गुणांवर अचूक निशाणा साधणाऱ्या अतानूला कोरियाविरुद्ध एकदाही १० गुण मिळवता आले नाही. मिश्र दुहेरीत प्रवीण आणि दीपिका कुमारी जोडीला कोरियाच्याच जोडीने स्पर्धेबाहेर केले होते. कोरियाविरुद्धच्या पराभवामुळे भारताचे दुहेरीच्या सर्व प्रकारांतील आव्हान संपुष्टात आले असून बुधवारपासून एकेरीच्या सामन्यांना प्रारंभ होणार आहे.

ऑलिम्पिकमध्ये प्रत्येक सामना जिंकू किंवा मरूअशा स्वरूपातील असतो. कोरियाविरुद्ध आमची कामगिरी फार सुमार झाल्याचे मान्य असून एकेरीच्या फेरीत नक्कीच उत्तम खेळ करू.

अतानू दास

बॉक्सिंग : आशीषचे आव्हान संपुष्टात

’  टोक्यो : भारताचा बॉक्सिंगपटू आशीष चौधरीचे (७५ किलो) ऑलिम्पिक पदार्पण सलामीच्याच लढतीत चीनच्या एर्बिके टॉहेटाकडून पराभवामुळे अपयशी ठरले. माजी आशियाई रौप्यपदक विजेत्या आशीषने एर्बिकेकडून ०-५ अशा फरकाने पराभव पत्करला. दुसऱ्या फेरीत आशीषने अधिक आक्रमक खेळाचे प्रदर्शन करीत सामन्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला; परंतु हिमाचल प्रदेशचा २७ वर्षीय बॉक्सिंगपटू आशीषचा चिनी प्रतिस्पर्ध्याविरुद्ध निभाव लागला नाही. अखेरच्या तीन मिनिटांत आशीषने शरणागती पत्करली. त्यामुळे पंचांनी एर्बिकेच्या बाजूने बिनविरोध कौल दिला. विकास क्रिशनआणि मनीष कौशिक यांच्यानंतर ऑलिम्पिकमधून गाशा गुंडाळलेला आशीष हा तिसरा भारतीय बॉक्सिंगपटू ठरला आहे.

टेनिस : मेदव्हेदेवपुढे नागल शरण

’  टोक्यो : जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर विराजमान असलेल्या डॅनिल मेदव्हेदेवपुढे क्रमवारीत १६०व्या क्रमांकावर असलेला सुमित नागल पूर्णत: निष्प्रभ झाला. त्यामुळे सोमवारी टोक्यो ऑलिम्पिकमधील भारतीय टेनिसपटूंचे आव्हान संपुष्टात आले. एरिआके टेनिस केंद्रावरील लढतीत रशियाच्या मेदव्हेदेवने ६६ मिनिटांत नागलचा ६-२, ६-१ अशा पद्धतीने फडशा पाडला. ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेतील उपविजेत्या मेदव्हेदेवने सामन्यावर आरामात नियंत्रण मिळवले. नागलने पहिल्या फेरीत उझबेकिस्तानच्या डेनिस इस्टोमिनला नमवण्याची किमया साधली होती. त्याआधी, २०१९च्या अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत ग्रँडस्लॅम पदार्पण करताना नागलने रॉजर फेडररविरुद्ध एक सेट जिंकत लक्ष वेधले होते.

नेमबाजी : स्कीटमध्ये अंगद १८वा, तर मैराज २५वा

’  टोक्यो : पुरुषांच्या स्कीट प्रकारात भारताच्या नेमबाजीमधील अपयशाची मालिका सोमवारीसुद्धा कायम राहिली. अंगद वीर सिंह बाजवाला १८व्या आणि मैराज अहमद खानला २५व्या स्थानावर समाधान मानावे लागले. असाका नेमबाजी केंद्रावर झालेल्या या स्पर्धेत पाच मालिकांमध्ये २५ वर्षीय अंगदने १२० गुण मिळवले, तर मैराजने ११७ गुण मिळवले. पहिल्या दिवशी तीन फेऱ्यांमध्ये अंगदने ११वे स्थान राखत अंतिम फेरीसाठी आशा निर्माण केली होती; परंतु दुसऱ्या दिवशी तीनदा लक्ष्य हुकल्याने त्याचे आव्हान संपुष्टात आले. २४, २५, २४, २३, २४ असे गुण त्याने कमावले. २०१८ मध्ये कुवेतला झालेल्या आशियाई शॉटगन अजिंक्यपद स्पर्धेतील स्कीट प्रकारात अंगडने ६० पैकी ६० गुण मिळवून जागतिक विक्रम प्रस्थापित केला होता. मैराजला मात्र पहिल्या दिवशीच्या कामगिरीत कोणतीही सुधारणा करता आली नाही. त्याने अनुक्रमे २५, २४, २२, २३, २३ असे गुण मिळवले.

बॅडमिंटन : सात्त्विक-चिराग अव्वल जोडीकडून नामोहरम

’  टोक्यो : जागतिक क्रमवारीत अग्रस्थानावर असलेल्या इंडोनेशियाच्या गिडीऑन फेर्नाल्डी आणि केव्हिन संजया सुकोमुल्जो जोडीकडून सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारताच्या दुहेरीतील जोडीने सोमवारी पराभव पत्करला. सात्त्विक-चिराग जोडीने ३२ मिनिटांत १३-२१, १२-२१ अशी शरणागती पत्करली. सुकामुल्जो-गिडीऑन जोडी सध्या गटात अव्वल असून, सात्त्विक-चिराग दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे पुढील फेरीचे आशा राखण्यासाठी सात्त्विक-चिरागला इंग्लंडच्या बेन लेन आणि सीन व्हेन्डी जोडीविरुद्ध विजयाची नितांत आवश्यकता आहे.

जलतरण : साजन प्रकाशची उपांत्य फेरी हुकली

’  टोक्यो : भारताचा जलतरणपटू साजन प्रकाश पुरुषांच्या २०० मीटर बटरफ्लाय प्रकाराची उपांत्य फेरी गाठण्यात अपयशी ठरला. सोमवारी दुसऱ्या शर्यतीत प्रकाशने चौथा क्रमांक पटकावला. गेल्या महिन्यात इटली येथे झालेल्या ऑलिम्पिक पात्रता जलतरण स्पर्धेत प्रकाशने १:५६.२२ अशी वेळ नोंदवत ‘अ’ निकष प्राप्त केले होते; परंतु ऑलिम्पिकमध्ये १:५७.२२ अशी वेळ नोंदवल्यामुळे ३८ जलतरणपटूंपैकी त्याला २४वा क्रमांक मिळाला. पहिल्या १६ स्पर्धकांना उपांत्य फेरीत प्रवेश देण्यात आला. प्रकाश गुरुवारी १०० मीटर बटरफ्लाय प्रकारात सहभागी होणार आहे.

हॉकी : जर्मनीकडून भारतीय महिला संघ पराभूत

’  टोक्यो : ऑलिम्पिक हॉकी स्पर्धेत भारतीय महिलांचा सोमवारी सलग दुसरा पराभव झाला. अ-गटात रिओ ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या जर्मनीने भारताला २-० असे पराभूत केले. पहिल्या सामन्यात जागतिक क्रमवारीत अग्रस्थानावर असलेल्या नेदरलँड्सकडून १-५ असा दारुण पराभव पत्करणाऱ्या भारतीय संघाने क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावरील जर्मनीला चांगली लढत दिली. परंतु ती पराभव टाळण्यात अपुरी पडली. जर्मनीकडून कर्णधार नायके लॉरेंझ (१२व्या मि.) आणि अ‍ॅना श्रॉडर (३५व्या मि.) यांनी गोल केले. सामन्याच्या तिसऱ्या सत्रात गुर्जित कौरचा पेनल्टी स्ट्रोकद्वारे गोल करण्याचा प्रयत्न अपयशी ठरला. याशिवाय अनेक संधी भारतीय संघाने वाया घालवल्या.

’  ऑस्ट्रेलियाविरुद्ध दारुण पराभव पत्करल्यानंतर भारतीय संघ मंगळवारी गटातील तिसऱ्या सामन्यात स्पेनला नमवून कामगिरी उंचावण्यासाठी प्रयत्नशील आहे.

 

आजचे वेळापत्रक

* बॅडमिंटन

पुरुष दुहेरी : सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी वि. बेन लेन आणि सीन व्हेंडी (ग्रेट ब्रिटन)

#    सकाळी ८.३० वा.

* बॉक्सिंग

महिला (६९ किलो) उपउपांत्यपूर्व फेरी : लव्हलिना बोर्गोहेन वि.नॅडिन अ‍ॅपेट्झ (जर्मनी)

#    सकाळी ११.३३ वा.

* हॉकी

पुरुष : भारत वि. स्पेन

सकाळी ६.३० वा.

* शिडाच्या बोटींची शर्यत

पुरुष : विष्णू सरवानन

#    सकाळी ८.४५ वा.

महिला : नेत्रा कुमानन

#    सकाळी ११.५० वा.

* नेमबाजी

१० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक पात्रता फेरी : सौरभ चौधरी आणि मनू भाकर, यशस्विनी देस्वाल आणि अभिषेक वर्मा

#    सकाळी ५.३० वा.

१० मीटर एअर रायफल मिश्र सांघिक पात्रता फेरी : इलाव्हेनिल व्हॅलारिव्हन आणि दिव्यांश सिंह पन्वार आणि अंजुम मुदगिल आणि दीपक कुमार

#    सकाळी १०.४५ वा.

* टेबल टेनिस

पुरुष एकेरी :

शरथ कमल वि. मा लाँग (चीन)

#    सकाळी ८.३० वा.

* थेट प्रक्षेपण : सोनी टेन २, ३ (हिंदी), सोनी सिक्स व संबंधित एचडी वाहिन्यांवर