अन्वय सावंत
भारत, जागतिक क्रीडा स्पर्धा आणि अपेक्षा हे समीकरण फारसे जुळत नसल्याचे वारंवार म्हटले जाते. जागतिक स्पर्धामध्ये भारतीय खेळाडूंकडून कायमच पदकांच्या अपेक्षा असतात; परंतु बहुतांश वेळा या अपेक्षा पूर्ण होतातच असे नाही. आता मात्र यात बदल झाला आहे आणि याचे श्रेय टोक्यो ऑलिम्पिक व पॅरालिम्पिकमध्ये अभूतपूर्व यश मिळवणाऱ्या खेळाडूंना जाते. भारतीय खेळाडूंनी ऑलिम्पिकमध्ये यंदा विक्रमी सात पदके जिंकून या यशाचा पाया रचला, तर भारताच्या पॅरा-खेळाडूंनी पदकांचा दुहेरी आकडा अगदी सहजरीत्या पार करत त्यावर कळस चढवला.

क्रिकेटप्रेमी भारतीयांचे इतर खेळांकडे लक्ष वेधणे जरा अवघड असते; परंतु टोक्यो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्रा आणि अन्य खेळाडूंनी केलेल्या कामगिरीमुळे अशक्य ते शक्य झाले. भारतामध्ये खेळांसाठी पोषक वातावरण निर्माण झाले. त्यामुळे पॅरालिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय खेळाडूंकडून अपेक्षा अधिकच वाढल्या. भारताच्या पॅरा-खेळाडूंनी या अपेक्षा केवळ पूर्ण केल्या नाहीत, तर त्यांनी १७हूनही अधिक पदके जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केली.

१९६८ मध्ये पॅरालिम्पिकमध्ये पदार्पण करणाऱ्या भारताला २०१६ पर्यंत केवळ १२ पदके जिंकण्यात यश आले होते. तसेच भारताने कोणत्याही पॅरालिम्पिक स्पर्धासाठी २०हून अधिक खेळाडूंचे पथक पाठवले नव्हते. यंदा मात्र भारताने तब्बल ५४ पॅरा-खेळाडूंचे पथक टोक्योमध्ये धाडले. भारतीय खेळाडू जागतिक स्तरावर अपेक्षा पूर्ण करण्यात कमी पडतात, मोक्याच्या क्षणी त्यांना सर्वोत्तम खेळ करता येत नाही, अशी टीका केली जाते. भारतीय पॅरा-खेळाडूंची कामगिरी मात्र या टीकेच्या अगदी विरुद्ध होती. अपंगत्वामुळे आयुष्यातील विविध आव्हानांवर मात करत पॅरालिम्पिकसारखा संघर्षमय पल्ला गाठणाऱ्यांना मैदानातील कोणतेही आव्हान थोडेच अवघड वाटणार आहे.

यंदा ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक या क्रीडा क्षेत्रातील दोन्ही सर्वात मोठय़ा स्पर्धात भारतीय खेळाडूंनी केलेल्या कामगिरीत बरेचसे साम्य होते. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले पदक हे वेटलिफ्टिंगपटू मीराबाई चानूने मिळवून दिले होते. त्याचप्रमाणे पॅरालिम्पिकमध्ये टेबल टेनिसपटू भाविना पटेल या महिला खेळाडूने भारताचे पदकांचे खाते उघडून दिले. विशेष म्हणजे, या दोघींनीही रौप्यपदकाची कमाई केली. भालाफेकपटू नीरज चोप्राने ऑलिम्पिक अ‍ॅथलेटिक्समध्ये भारतासाठी पहिले सुवर्णपदक जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. त्याच्याकडून प्रेरणा घेत पॅरालिम्पिकमध्ये नीरजप्रमाणेच हरयाणापुत्र सुमित अँटिलने भालाफेकीत सुवर्णपदक जिंकले. त्याने विश्वविक्रमही (६८.५५ मीटर) प्रस्थापित केला.

तसेच टोक्यो ऑलिम्पिकमध्ये विश्वविजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने कांस्यपदक जिंकताच विक्रमाला गवसणी घातली. ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी ती भारताची पहिली महिला क्रीडापटू ठरली. पॅरालिम्पिकमध्येही हा योगायोग जुळून आला. नेमबाज अवनी लेखराच्या (सुवर्ण आणि कांस्य) रूपात भारताला पॅरालिम्पिक स्पर्धातील पहिली दोन पदकविजेती महिला खेळाडू लाभली. या दोन्ही स्पर्धामध्ये भारताने एका पर्वात सर्वाधिक पदकांचा आपला विक्रमही मोडला. मात्र या दोन स्पर्धातील भारताच्या कामगिरीत फरकही होता.

यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये नेमबाज भारताला सर्वाधिक पदके जिंकवून देतील अशी अपेक्षा वर्तवण्यात येत होती. भारतीय नेमबाजांना अचूक वेध काही साधता आला नाही आणि या क्रीडा प्रकारातील भारताची पदकांची पाटी कोरीच राहिली. दुसरीकडे पॅरालिम्पिकमध्ये मात्र नेमबाजीत भारताला दोन सुवर्णपदकांसह पाच पदके जिंकण्यात यश आले. १९ वर्षीय नेमबाज अवनीची कामगिरी खास ठरली. वयाच्या ११व्या वर्षी झालेल्या अपघातामुळे अवनीच्या पाठीच्या मणक्याला दुखापत झाली आणि त्यानंतर ती चालू शकली नाही; परंतु तिने यंदाच्या पॅरालिम्पिकमधील भारतासाठी पहिले सुवर्णपदक जिंकण्याची किमया साधली.

भालाफेकपटू देवेंद्र झझारिया आणि उंच उडीपटू मरियप्पन थंगावेलू या रिओ पॅरालिम्पिकमधील सुवर्णपदकविजेत्या अनुभवी खेळाडूंनी कामगिरीत सातत्य राखताना यंदा रौप्यपदकांची कमाई केली. तसेच नेमबाज सिंघराज अदानाने दोन पदके मिळवली. निषाद कुमार (रौप्य) आणि प्रवीण कुमार (रौप्य) या युवकांनीही पदक जिंकण्याचा मान पटकावला.

उगवत्या सूर्याच्या देशात धडाकेबाज कामगिरी करत पॅरालिम्पिकमधील भारतीय खेळाडूंनी आपल्या यशाचा लख्ख प्रकाश पसरवला आहे. भारतीय क्रीडा क्षेत्र आता योग्य मार्गावर असल्याचे सिद्ध झाले आहे; परंतु भारताला अजून बराच पल्ला गाठायचा आहे. खेळाडूंनी अशीच मेहनत सुरू ठेवली, त्यांना सरकार आणि क्रीडा संघटनांची साथ लाभली, चाहत्यांचा पाठिंबा मिळाला, तर यंदा केलेले विक्रम भारतीय खेळाडू लवकरच मोडतील यात तिळमात्रही शंका नाही.

anvay.sawant@expressindia.com