कुस्तीपटू रवीकडून चौथ्या पदकाची निश्चिती; सानायेव्हला चीतपट करून अंतिम फेरीत धडक

शिबा (जपान) : रवी दहिया बुधवारी ऑलिम्पिक सुवर्णपदकाच्या लढतीपर्यंत धडक मारणारा भारताचा दुसरा कुस्तीपटू ठरला आहे. ५७ किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत त्याने कझाकस्तानच्या नुरिस्लाम सानायेव्हला चीतपट करून अंतिम फेरी गाठण्याची किमया साधली. कुस्तीमधील हे भारताचे सहावे पदक असेल.

रवीच्या आधी २०१२च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये सुशील कुमारने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती; परंतु त्याला उपविजेतेपदापर्यंत समाधान मानावे लागले होते. चौथा मानांकित रवी सानायेव्हविरुद्धच्या लढतीत २-९ असा पिछाडीवर होता; परंतु रवीने हिमतीने मुसंडी मारत प्रतिस्पर्ध्याच्या दोन्ही पायांवर नियंत्रण मिळवत त्याला चीतपट करीत हा डाव जिंकला.

गुरुवारी होणाऱ्या अंतिम फेरीत रवीची गाठ रशियाच्या विश्वविजेत्या झ्ॉऊर युगुएव्हशी पडणार आहे. पहिल्या सत्रात रवी २-१ असा आघाडीवर होता; परंतु सानायेव्हने तयारीनिशी रवीच्या डाव्या पायाची पकड मिळवत सहा गुण मिळवले. परंतु तंदुरुस्तीच्या बळावर एका मिनिटात त्याने सामन्याचे चित्र पालटले. रवीने त्याला चीतपट करीत सामना निकाली ठरवला.

रवीने सलामीच्या सामन्यात कोलंबियाच्या ऑस्कर टिग्रेरोसला १३-२ असे हरवले, त्यानंतर बल्गेरियाच्या जॉर्जी व्हॅलेंटिनोव्हचा १४-४ असा पराभव केला.

दीपकला कांस्यच्या आशा

८६ किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत अमेरिकेच्या डेव्हिड मॉरिसकडून पराभूत होणाऱ्या दीपक पुनियाच्या कांस्यपदकाच्या आशा जिवंत आहेत. आता गुरुवारी मायलीस अ‍ॅमिने आणि अली शबानाऊ यांच्यातील रॅपिचाज सामन्यातील विजेत्याशी दीपकची कांस्यपदकाची लढत होईल.

सानायेव्हला याआधी मी दोनदा हरवल्यामुळे मोठय़ा फरकाने पिछाडीवर पडल्यानंतर सामन्यावर नियंत्रण मिळवू शकेन, हा विश्वास होता; परंतु अजूनही माझ्या लक्ष्याची पूर्तता झालेली नाही.

रवी दहिया

अंशूला दुसरी संधी

अंशू मलिकाने ५७ किलो वजनी गटातील आपली सलामीची लढत युरोपियन विजेत्या बेलारूसच्या इरिना कुराशिकिनाविरुद्ध गमावली. परंतु इरिना अंतिम फेरीत पोहोचल्याने १९ वर्षीय अंशूला पदकाची दुसरी संधी प्राप्त झाली आहे. गुरुवारी रेपिचाज लढत जिंकल्यास अंशूला कांस्यपदकाची लढत खेळता येईल.