टोक्यो ऑलम्पिक स्पर्धा तोंडावर आलेली असतानाच भारतीय ऑलम्पिक महासंघाने (आयओए’) खेळासाठी कपडे तयार करणाऱ्या चिनी कंपनीसोबतचा करार तोंडण्याचा निर्णय घेतला आहे. जनभावनेचा आदर करून हा करार तोडण्यात आला आहे. महिनाअखेरीपर्यंत नवीन किट प्रायोजकाचा शोध घेतला जाईल, असं महासंघाने म्हटलं आहे. गलवान व्हॅलीत झालेल्या रक्तरंजित संघर्षापासून भारताने चिनी कंपन्यांसाठी दरवाजे बंद करण्याचं धोरण स्वीकारलेलं आहे. यापूर्वी अनेक ‘चिनी अॅप्स’वर बंदी घालण्यात आलेली आहे.

नागरिकांच्या भावनांचा आदर करून चिनी क्रीडा साहित्यनिर्मिती कंपनी लि निंगशी करार मोडल्यानंतर भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (आयओए) भारताच्या ऑलिम्पिक पथकासाठी नव्या पुरस्कर्त्यांचा शोध सुरू केला आहे. परंतु भारतीय क्रीडापटूंच्या क्रीडा साहित्यावर पुरस्कर्त्यांचे बोधचिन्ह नसेल,” अशी माहिती क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी दिली.

‘आयओए’ने लि निंगशी झालेला अधिकृत क्रीडा साहित्य स्पॉन्सरशिपचा करार रद्द केला. आता नव्या पुरस्कर्त्यांचा शोध सुरू आहे, असे ‘आयओए’चे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांनी सांगितले.

‘‘स्पॉन्सरशिप करणाऱ्या नव्या कंपनीच्या शोधाची प्रक्रिया सुरू झाली आहे. महिन्याअखेरीस पुरस्कर्त्यांबाबतचा निर्णय स्पष्ट होऊ शकेल. ऑलिम्पिकपात्र क्रीडापटूंचे क्रीडा साहित्य तयार आहे,’”’ असेही बत्रा यांनी सांगितले.

‘‘देशातील सध्याच्या वातावरणाची जाणीव असल्यामुळे आम्ही ‘आयओए’चा निर्णय मान्य केला,’’ असे लि निंग कंपनीचे भारतीय वितरक सनलाइट स्पोर्ट्स यांनी सांगितले. ‘आयओए’ने गेल्या आठवडय़ात रिजिजू यांच्या हस्ते भारतीय क्रीडापटूंना ऑलिम्पिक क्रीडा साहित्य सुपूर्द केले. चीनमधील कंपनीशी भारताने करार केल्यामुळे यावर जोरदार टीका झाली. त्यानंतर क्रीडा मंत्रालयाने ‘आयओए’ला लि निंगशी असलेला करार स्थगित करण्याचे निर्देश दिले होते.