टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगट पराभूत झाल्यानंतर भारताच्या नजरा कुस्तीपटू सीमा बिस्लाच्या खेळाकडे लागलं होतं. महिलांच्या ५० किलो वजनी गटातील फ्री स्टाईल सामन्यात सीमा बिस्लाचा पराभव झाला आहे. ट्युनिशियाची खेळाडू सारा हमदी हिने भारताच्या सीमा बिस्लाला पराभूत केलं.

टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेचा आज १५वा दिवस असून दिवसाची सुरूवात भारतासाठी निराशाजनक ठरली. कुस्तीपटू विनेश फोगट पराभूत झाल्यानंतर भारताला कुस्तीपटू सीमा बिस्लाकडून पदकाची आशा होती. महिलांच्या ५० किलो वजनी गटात भारताच्या सीमा बिस्लाचा ट्युनिशियाच्या सारा हमदीसोबत सामना झाला.

या सामन्यात सारा हमदीने सुरूवातीपासूनच आघाडी घेतली. पहिल्या ब्रेकनंतर सीमा बिस्ला ०-१ अशा फरकाने पिछाडीवर होती. नंतर सामना सुरू झाल्यानंतरही सीमा बिस्लाला वापसी करता आली नाही. सारा हमदीने आघाडी कायम ठेवत सीमाचा ३-१ अशा फरकाने पराभव केला.

सीमा बिस्लाला मिळू शकते कांस्यपदकाची संधी

सीमा बिस्ला आणि सारा हमदी यांच्यात उपांत्यपूर्व फेरीतील सामना झाला. प्रतिस्पर्धी सारा हमदी जर अंतिम फेरीत पोहोचली, तर सीमा बिस्लाला कांस्यपदकासाठी खेळण्याची संधी मिळू शकते. त्यासाठी भारताला सारा हमदी अंतिम फेरीत पोहोचण्याची वाट बघावी लागणार आहे.

विनेश फोगटकडून निराशा

टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेच्या १४व्या दिवशी कुस्तीपटू विनेश फोगटने ५३ किलो वजनी गटातील फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात स्वीडनच्या सोफिया मेडालेनाचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. सोफिया मेडालेनाचा ७-१ अशा फरकाने पराभव केल्यानं विनेश उपांत्यपूर्व फेरीतही याच कामगिरीची पुनरावृत्ती करेल अशी आशा होती. मात्र, तिला पराभवाचा सामना करावा लागला.