Olympics Women’s Hockey : कांस्यपदकाचं स्वप्नभंग; चुरशीच्या लढतीत भारत ब्रिटनकडून ३-४ ने पराभूत

ब्रिटनने तिसऱ्या क्वार्टर्समध्ये ३-३ ची बरोबर केल्याने अंतीम १५ मिनिटं महत्वाची ठरली. शेवटच्या १५ मिनिटांनंतर सामन्याचे अंतिम स्कोअरकार्ड ४-३ असं होतं.

Team India Hockey
भारत चौथ्या स्थानावर (फाइल फोटो सौजन्य : रॉयटर्स)

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये शुक्रवारी भारतीय महिला हॉकी संघाला पुरुषांप्रमाणेच ऐतिहासिक कामगिरी करण्यात अपयश आलं. रिओ ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या ब्रिटनच्या संघाने भारतीय महिला संघाला ४-३ ने पराभूत करत कांस्यपदकावर आपलं नाव कोरलं आहे. पहिल्या १५ मिनिटांमध्ये गोलशून्य बरोबरीनंतर दुसऱ्या क्वार्टरमध्ये तब्बल पाच गोल झाले. ब्रिटनने १-० ची आघाडी बऱ्याच काळ टीकवली होती. त्यानंतर अवघ्या दहा मिनिटांमध्ये सामन्यात चार गोल्स झाले. यापैकी ब्रिटनने एक गोल केला. तर भारताने अवघ्या नऊ मिनिटांमध्ये तीन गोल करत हाफ टाइममध्ये ३-२ ची आघाडी मिळवली. ब्रिटनने तिसऱ्या क्वार्टर्समध्ये ३-३ ची बरोबर केल्याने अंतीम १५ मिनिटं महत्वाची ठरली. शेवटच्या १५ मिनिटांनंतर सामन्याचे अंतिम स्कोअरकार्ड ४-३ असं होतं.

नक्की पाहा हे फोटो >> Olympics: …अन् त्या मैदानातच रडू लागल्या; या फोटोंचं वर्णन करण्यासाठी शब्दच नाहीत

पहिला क्वार्टर : पहिल्या क्वार्टरमधील १५ मिनिटांच्या खेळानंतर एकाही संघाला गोल करता आला नाही. पहिल्या १५ मिनिटांचा खेळ झाल्यानंतर दोन्ही संघ गोलशून्य बरोबरीत होते.

दुसरा क्वार्टर : दुसऱ्या क्वार्टरच्या सुरुवातीलाच ब्रिटनने गोल करत १-० ची आघाडी मिळवली. ब्रिटनच्या एलिना रायरने संघासाठी पहिला गोल केला. त्यानंतर बराच वेळ ब्रिटनने ही आघाडी टिकवली. भारताला नंतर एक पेनल्टी कॉर्नर मिळाला मात्र त्याचे गोलमध्ये रुपांतर करण्यात भारताला अपयश आलं. दरम्यान त्यानंतर काही मिनिटांमध्ये ब्रिटनने दुसरा गोल करत सामन्यात २-० ने आघाडी मिळवली. या गोलनंतर अवघ्या दोन मिनिटांमध्ये भारताच्या गुरजीत कौरने भारताकडून पहिला गोल केलं. त्यानंतर लगेचच दुसऱ्या मिनिटाला सलीमा तीतीने भारतासाठी मिळवलेल्या पेनल्टी कॉर्नरवरही गुरजीतने गोल करत सामना २-२ च्या बरोबरीत आणला. या पेनल्टी कॉर्नरनंतर पाच मिनिटांनी हाफ टाइमच्या एक मिनिट आधी भारताने आपला तिसरा गोल नोंदवला. भारतीय संघाने दुसऱ्या क्वार्टरच्या शेवटच्या नऊ मिनिटांमध्ये तीन गोल करत सामन्याच्या पूर्वाधात ३-२ ची आघाडी मिळवली होती.

नक्की वाचा >> Olympics 2020: पराभूत झालेल्या भारतीय महिला संघासाठी ‘चक दे..’च्या कबीर सरांचा खास संदेश; म्हणाले, “आम्ही…”

तिसरा क्वार्टर : तिसऱ्या क्वार्टरचा खेळ सुरु झाल्यानंतर  सात मिनिटांमध्येच ब्रिटनने इक्वलायझर गोल केला आणि सामना ३-३च्या बरोबरत आणला. या क्वार्टरमध्ये ब्रिटन आणि भारत दोघांनाही आपल्या पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्यात अपयश आलं. तिसऱ्या क्वार्टरनंतर सामना पुन्हा ३-३च्या बरोबरीत होता.

चौथा क्वार्टर : चौथ्या क्वार्टरचा खेळ सुरु झाल्यानंतर ब्रिटनने तिसऱ्या मिनिटालाच गोल करत सामन्यात ४-३ ची आघाडी मिळवली. ही आघाडी निर्णायक ठरली. नंतर भारताने आक्रामक खेळ करत सामना बरोबरीत सोडवण्यासाठी अनेकदा प्रयत्न केले. मात्र भारताला त्यामध्ये यश आलं नाही आणि रिओमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या ब्रिटनने सामना एका गोलच्या फरकाने जिंकला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Tokyo olympics womens hockey bronze medal match india lost against great britain scsg

ताज्या बातम्या