पदकचौकार!

टोक्यो पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या समारोपाच्या आदल्या दिवशी शनिवारी भारताने ‘पदकचौकार’ खेचला.

टोक्यो पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या समारोपाच्या आदल्या दिवशी शनिवारी भारताने ‘पदकचौकार’ खेचला. त्यामुळे भारताच्या पदकसंख्येने १७ विक्रमी आकडा गाठला असून, पदकतालिकेतही २६वे स्थान प्राप्त केले आहे. मनीष नरवाल आणि सिंहराज अदाना यांनी अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्यपदकासह नेमबाजीत पदकलूट कायम राखली. बॅडमिंटनपटू प्रमोद भगतने सोनेरी कामगिरीसह आपले श्रेष्ठत्व सिद्ध केले. याशिवाय मनोज सरकारने कांस्यपदकाची कमाई केली. याशिवाय रविवारी अखेरच्या दिवशी पाच स्पर्धामध्ये भारताला पदकाच्या अपेक्षा राखता येतील.

मनीषला सुवर्ण, तर सिंहराजला रौप्य

नेमबाज मनीष नरवालने शनिवारी स्पर्धाविक्रमासह टोक्यो पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेतील भारताच्या तिसऱ्या सुवर्णपदकाची नोंद केली, तर सहकारी सिंहराज अदानाने रौप्यपदकाची कमाई केली. फरिदाबादच्या या जोडगोळीने पहिल्या दोन क्रमांकांवर वर्चस्व गाजवून भारताच्या पदकसंख्येत भर घातली.

विश्वविक्रम नावावर असलेल्या १९ वर्षीय मनीषने पी४ मिश्र ५० मीटर पिस्तूल एसएच१ क्रीडा प्रकारात २१८.२ गुणांची कमाई करीत पॅरालिम्पिक विक्रमासह प्रथम क्रमांक मिळवला. मनीषला बालपणीपासून खेळाची अतिशय आवड होती. त्याला फुटबॉलपटू व्हायचे होते. परंतु उजव्या हाताच्या जन्मजात आजारपणामुळे त्याचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. पण मनीषच्या कुस्तीपटू वडिलांनी मुलाने खेळाडू व्हावे असेच वाटत होते. २०१६मध्ये एका मित्राच्या सल्ल्याने मनीष बल्लबगढ येथील प्रशिक्षक राकेश ठाकूर यांच्या नेमबाजी केंद्रात दाखल झाला. त्यामुळे मनीषचे आयुष्य बदलले. मग त्याच्यामधील व्यावसायिक गुणवत्ता प्रशिक्षक जयप्रकाश नौतियाल यांनी हेरली. त्यामुळे २०१७च्या बँकॉक विश्वचषकातील एअर पिस्तूल प्रकारात मनीषने वैयक्तिक सुवर्णपदक पटकावले, तर २०१८च्या पॅरा-आशियाई क्रीडा स्पर्धेत त्याने रौप्यपदक जिंकले.

३९ वर्षीय सिंहराजने २१६.७ गुणांसह दुसऱ्या पॅरालिम्पिक पदकावर नाव कोरले. मंगळवारी पी१ पुरुषांच्या एअर पिस्तूल एसएच१ प्रकारात त्याने कांस्यपदक प्राप्त केले होते. याआधी, पात्रता फेरीत सिंहराजला ५३६ गुणांसह चौथा क्रमांक मिळाला, तर मनीषला ५३३ गुणांसह सातवा क्रमांक मिळाला.

४ पॅरालिम्पिकमध्ये दोन किंवा अधिक पदके जिंकणारा सिंहराज अदाना हा भारताचा चौथा क्रीडापटू आहे. सिंहराजने मिश्र ५० मीटर पिस्तूलमध्ये रौप्यपदक आणि १० मीटर एअर रायफलमध्ये कांस्यपदक प्राप्त केले. १९८४च्या पॅरालिम्पिकमध्ये जोगिंदर सिंग सोधीने एक रौप्य (गोळाफेक) आणि दोन कांस्यपदके (थाळीफेक, भालाफेक) जिंकली. मग भालाफेकपटू देवेंद्र झझारियाने दोन सुवर्ण आणि एक रौप्यपदक पटकावले आहे. अवनी लेखाराने १० मीटर एअर रायफलमध्ये सुवर्णपदक आणि ५० मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये कांस्यपदक पटकावले.

राष्ट्रगीतावर राष्ट्रध्वज उंचावत असताना मला स्वत:चा अभिमान वाटत होता. मी पाहिलेले स्वप्न पूर्णत्वास आले. टोक्यो पॅरालिम्पिकमधील कांस्य आणि रौप्य पदकांचे हे क्षण माझ्या आयुष्यभर स्मरणात राहतील. माझे प्रशिक्षक आणि अन्य मार्गदर्शकांचा मी आभारी आहे.

सिंहराज अदाना

सुवर्णपदक जिंकल्याचा अतिशय आनंद होतो आहे. पॅरालिम्पिकमधील सुवर्णयशासाठी मी प्रशिक्षक, कुटुंबीय आणि सर्व भारतीयांचा ऋणी आहे.

-मनीष नरवाल

यंदा प्रथमच पॅरालिमिकची दारे बॅडमिंटनसाठी खुली झाली आणि मला या पहिल्याच प्रयत्नात सुवर्णपदक मिळाले. हा माझ्यासाठी अत्यंत अभिमानास्पद क्षण आहे. मी भारतीय बॅडमिंटन समुदाय आणि संपूर्ण देशाचे प्रतिनिधित्व केले. मी दोन वर्षांपूर्वी याच प्रतिस्पध्र्याविरुद्ध खेळल्याने त्या अनुभवातून बरेच काही शिकलो होतो.

-प्रमोद भगत

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Tokyo paralympic games last day medals akp