Tokyo Paralympics: भारताची भाविना पटेल सुवर्णपदकापासून एक विजय दूर; ठरणार का गोल्ड जिंकणारी पहिली महिला?

उपांत्य फेरीमध्ये चीनच्या झँग मियाओला पराभूत करत दणक्यात अंतिम फेरीत प्रवेश केला

Bhavina Patel
उपांत्य फेरीत चिनी खेळाडूचा केला पराभव (फोटो ट्विटरवरुन साभार)

टेबल टेनिसपटू भाविना पटेलने टोक्यो पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत इतिहास घडवत अंतिम फेरीत प्रवेश निश्चित केलाय. या स्पर्धेमध्ये तिने उपांत्य फेरीमध्ये चीनच्या झँग मियाओला पराभूत करत दणक्यात अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीमध्ये पोहचणारी ती पहिली भारतीय टेबल टेनिसपटू ठरली आहे. महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत भाविनाने सर्बियाच्या बोरिस्लाव्हा पॅरिच रँकोव्हिच हिचा सरळ सेटमध्ये पराभव केला होता.

३४ वर्षीय भाविनाने चीनच्या झँग मियाओला ३-२ असं सरळ सेटमध्ये पराभूत केलं. ७-११, ११-७, ११-४, ९-११, ११-८ ने भाविनाने उपांत्य सामना जिंकला. आतापर्यंत कोणत्याही भारतीय महिला खेळाडूला पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावता आलेलं नाही. त्यामुळेच भारताची पहिली गोल्डन गर्ल होण्याची संधी भाविनाकडे आहे. २०१६ मध्ये रियो ऑलिम्पिकमध्ये भारताची बॅटमिंटनपटू पीव्ही सिंधू आणि पॅराऑलिम्पियन दीपा मलिकने अंतिम फेरीत प्रवेश केलेला. मात्र त्यांना रौप्यपदकावर समाधान मानावलं लागलं होतं. आता भाविनाकडे सुवर्ण कामगिरी करुन इतिहास घडवण्याची चांगली संधी आहे.

२०१७मध्ये आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघाची तिसऱ्या क्रमांकाची लढत रद्द करण्याची विनंती आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक समितीने मान्य केली. त्यामुळे उपांत्य लढतीमधील दोन्ही पराभूत स्पर्धकांना कांस्यपदक दिले जाऊ लागले. म्हणूनच भाविनाने उपांत्य फेरी प्रवेश निश्चित केल्यानंतर तिचं पदक नक्की मानलं जातं होतं. याआधी, उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भाविनाने ब्राझिलच्या जॉयसे डी ऑलिव्हेराचा १२-१०, १३-११, ११-६ असा २३ मिनिटांत पराभव केला. तथापि, गटसाखळीमधील दोन्ही सामने गमावल्यामुळे गुरुवारी सोनल पटेलचे आव्हान संपुष्टात आले. त्यामुळे टेबल टेनिसमध्ये भाविनाकडून आता सुवर्णपदकाच्या आशा देशाला लागून राहिलेल्या आहेत.

भारतीय क्रीडारसिकांच्या पाठबळामुळे मी पॅरालिम्पिक पदक जिंकू शकले. भाविनालाही पाठबळ द्यावे, असे मी चाहत्यांना आव्हान करत असल्याचं या सामन्याआधी बोलताना भारतीय ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षा दीपा मलिक यांनी म्हटलं होतं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Tokyo paralympics table tennis women singles paddler bhavina patel storm into gold medal match scsg