पॅरालिम्पिकमध्ये भारताला मोठा धक्का; विनोद कुमारचं पदक घेतलं काढून, कारण दिलं…

विनोद यांचं पदक काढून घेण्यात आल्याने भारताची पदक संख्या सातवरुन सहावर घसरली आहे. भारताच्या खात्यावर रविवारची दोन आणि सोमवारीच चार अशी एकूण सहा पदकं आहेत.

Vinod Kumar
भारताची पदक संख्या सातवरुन सहावर आली (फोटो ट्विटरवरुन साभार)

टोक्योमध्ये सुरु असणाऱ्या पॅरालिम्पिकमध्ये सोमवारचा दिवस भारतीय खेळाडूंनी गाजवला. शूटिंगमध्ये भारताला सुवर्णपदक मिळालं तर भालाफेक आणि थाळीफेकमध्ये रौप्यपदकाची कमाई भारतीय खेळाडूंनी केली. यामुळे क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण असतानाच एका भारतीय खेळाडूचं कांस्यपदक काढून घेण्यात आलं आहे. थाळीफेकपटू विनोद कुमार यांचं कांस्यपदक काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय. एफ ५२ प्रकारच्या खेळांमध्ये ४१ वर्षीय विनोद कुमार थाळीफेकमध्ये तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते, त्यांनी १९.९१ मीटरची सर्वोत्तम कामगिरी करत आशियाई विक्रम रचला. कुमार यांनी पोलंडच्या पिओटर कोसेविच (२०.०२ मीटर) आणि क्रोएशियाच्या वेलिमीर सँडर (१९.९८ मीटर) यांच्या नंतर तिसरा क्रमांक पटकावत कांस्यपदक जिंकलं होतं. पण त्याचे कांस्यपदक काढून घेण्यात आलं आहे. कुमार यांना झालेला विकार हा पॅरालिम्पिकच्या नियमांमध्ये बसत नसल्याचे सांगत त्याचं पदक काढून घेण्यात आलं आहे.

विनोद यांनी तिसरा क्रमांक पटकावल्यानंतर त्यांना झालेला आजार हा पॅऱालिम्पिकच्या नियमांनुसार क्लासिफाय केला जाऊ शकतो का यावरुन प्रश्न उपस्थित करण्यात आला. यामुळेच त्यांचं मेडल रोखण्यात आलं होतं. यासंदर्भातील तपास केल्यानंतर कुमार यांना पदक नाकारण्यात आलं आहे. पुरुषांच्या एफ ५२ स्पर्धेत विनोद यांच्या अपंगत्व वर्गीकरणामुळे त्याचे पदक रोखण्यात आलं होतं. आयोजकांनी २२ ऑगस्ट रोजी विनोद यांचं वर्गीकरण केलं होतं. वर्गीकरणाला कोणत्या आधारावर आव्हान दिले गेले हे स्पष्ट करण्यात आलं नाही. क्रीडा आयोजकांनी दिलेल्या निवेदनानुसार कुमार यांच्यासंदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आल्याने या स्पर्धेचा पदक वितरण समारंभ ३० ऑगस्टच्या संध्याकाळच्या सत्रापर्यंत पुढे ढकलण्यात आला.

एफ ५२ स्पर्धा म्हणजे काय?

एफ ५२ हा दिव्यांगांच्या खेळामधील एक श्रेणी आहे. या श्रेणीमध्ये अशा खेळाडूंचा समावेश होतो, ज्यांचे स्नायूंची क्षमता कमी असते, स्नायूंची हालचाल मंद असते, हाताला काहीतरी व्याधी किंवा आजार असतो किंवा पायाच्या लांबीत फरक असतो. या प्रकारातील खेळाडू व्हिलचेअरवर बसून स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकतात. भारताचे संघप्रमुख गुरशरण सिंग यांनी कुमारच्या कामगिरीला विरोध हा एखाद्या किंवा कदाचित एकापेक्षा जास्त देशांनी केला असेल.

भारताची पदक संख्या सहावर…

विनोद यांचं पदक काढून घेण्यात आल्याने भारताची पदक संख्या सातवरुन सहावर घसरली आहे. विनोद यांच्या पदकासहीत रविवारी भारताची पदकसंख्या तीनपर्यंत पोहोचली होती. मात्र विनोद यांचं पदक काढून घेण्यात आल्याने भारताच्या खात्यावर रविवारची दोन आणि सोमवारीच चार अशी एकूण सहा पदकं आहेत. रविवारी टेबल टेनिसमध्ये भाविना पटेल, तर उंच उडीमध्ये निशाद कुमारने रौप्यपदक कमावले. सोमवारी भारतीय खेळाडूंनी एक सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्यपदक मिळवत दमदार कामगिरी केली. भारतीय नेमबाज अवनी लेखराने नेमबाजीत सुवर्णपदक जिंकले. या पॅरालिम्पिकमधील भारताचे हे पहिले सुवर्णपदक आहे. तर भारताच्या योगेश कथुरियाने पुरुषांच्या थाळीफेक स्पर्धेत रौप्यपदक जिंकले आहे. सोमवारी योगेश कथुरियाने ४४.३८ मीटरचा सर्वोत्तम थ्रो टाकत रौप्य पदक पटकावले. तर ब्राझीलच्या बेटिस्टा डॉस सँतोस क्लॉडीनने ४५.५९ मीटर थ्रो टाकत सुवर्णपदक मिळवले. यंदा भारताने ५४ खेळाडूंचा चमू टोक्योत पाठवला असून भारतीय पॅरालिम्पिकपटूंकडून एकूण पाच सुवर्णासह १५ पदकांची अपेक्षा केली जात आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Tokyo paralympics vinod kumar loses the bronze medal technical delegates decide he is not eligible for discus f52 class scsg