Tom Moody On Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशी हे नाव सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तुफान चर्चेत आहे. १५ वर्षांच्या या मुलाने अनेक दिग्गज गोलंदाजांची झोप उडवली आहे. सनरायझर्स हैदराबाद संघाविरूद्ध झालेल्या सामन्यात वैभवने विक्रमी खेळी केली. त्याच्याकडे सर्वात वेगवान शतक झळकावण्याची संधी होती. पण ही संधी थोडक्यात हुकली. पण त्याच्या या खेळीनंतर सचिन तेंडुलकरपासून ते ख्रिस गेलपर्यंत, सर्वच खेळाडूंनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. दरम्यान ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू टॉम मूडी यांनी वैभव सूर्यवंशीची तुलना ऑल टाईम ग्रेट सर डॉन ब्रॅडमन यांच्यासोबत केली आहे.

ईएसपीएन क्रिकइन्फोवर वैभव सूर्यवंशीबाबत बोलताना टॉम मूडी म्हणाले की, “मी हेच समजून घेण्याचा प्रयत्न करतोय की, हे शब्दांत कसं सांगू. याचं विश्लेषण करण्याचा एकमेव मार्ग आहे. तो म्हणजे, एखाद्याला सांगायचं की, हे आधी डोळे भरुन पाहा आणि त्यानंतर त्याने स्वत:च्या शब्दात व्यक्त करावं. कारण आपण सध्या जे पाहतोय, ते याआधी कधीही पाहिलेलं नाही. आपण याआधी बऱ्याच आश्चर्यकारक गोष्टी पाहिल्या आहेत. पण इतकं थरारक काहीतरी पाहण्याची ही पहिलीच वेळ आहे.”

तसेच टॉम मूडी यांनी वैभव सूर्यवंशीची तुलना थेट डॉन ब्रॅडमन यांच्यासोबत केली आहे. ते म्हणाले की, “एकच गोष्ट म्हणता येईल, ब्रॅडमन जे करत होते, त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये १०० च्या सरासरीने धावा केल्या. त्यानंतर दुसरी सर्वौत्तम सरासरी ६० ची आहे. तसंच १५ वर्षांच्या वयात टी-२० क्रिकेटमध्ये पाहायला मिळत आहे.” वैभव सूर्यवंशीने सनरायझर्स हैदराबाद संघाविरूद्ध झालेल्या एलिमिनेटरच्या सामन्यात ९७ धावांची दमदार खेळी केली. या खेळीच्या बळावर राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांअखेर २४३ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या सनरायझर्स हैदराबादचा डाव अवघ्या १९६ धावांवर आटोपला. यासह राजस्थान रॉयल्सने हा सामना ४७ धावांनी जिंकून स्पर्धेतील क्वालिफायर २ मध्ये प्रवेश केला आहे.

वैभव सूर्यवंशीने ९७ धावांच्या खेळीदरम्यान अनेक मोठे रेकॉर्ड मोडून काढले आहेत. याआधी आयपीएलच्या एकाच हंगामात सर्वाधिक षटकार खेचण्याचा रेकॉर्ड हा ख्रिस गेलच्या नावे होता. त्याने २०१३ मध्ये एकाच हंगामात ५९ षटकार खेचले होते. आता वैभवने ६५ षटकार खेचले आहेत. तर प्लेऑफमध्ये १६ चेंडूत अर्धशतक झळकावून त्याने सर्वात वेगवान अर्धशतक झळकावण्याच्या रेकॉर्डमध्ये सुरेश रैनाच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे.