भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठीच्या शर्यतीत कोणते चेहरे असतील, याची माहिती पुढे आली आहे. बीसीसीआयमधील सूत्रांच्या माहितीनुसार टॉम मुडी, वीरेंद्र सेहगाव, लालचंद राजपूत, डोडा गणेश, रिचर्ड पायबस आणि अनिल कुंबळे यांनी प्रशिक्षकपदासाठी अर्ज दाखल केले आहेत. याबद्दल बीसीसीआयकडून अद्यापपर्यंत अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, काही दिवसांपूर्वीच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सेहवागला मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्याची विनंती केली होती. त्यामुळे प्रशिक्षकपदासाठी अनिल कुंबळे आणि वीरेंद्र सेहवाग यांच्यात चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे.

बीसीसीआयने काही दिवसांपूर्वी टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी असणाऱ्या अनिल कुंबळे यांना मुदतवाढ मिळणार नसल्याचे जाहीर केले होते. कुंबळे यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कालावधी चॅम्पियन्स क्रिकेट करंडक स्पर्धेनंतर संपुष्टात येणार आहे. त्यानंतर प्रशिक्षकपदासाठी बीसीसीआयने अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू केली होती. सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा समावेश असलेल्या बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीपुढे प्रशिक्षकपदाचे अर्ज ठेवण्यात येतील आणि ते याबाबत अंतिम निर्णय घेतील. प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्याची ३१ मे ही तारीख ठरवण्यात आली होती.

खेळाडू आणि प्रशिक्षकांच्या करारामध्ये बीसीसीआयने वाढ करावी, अशी भूमिका कुंबळे यांनी काही दिवसांपूर्वी मांडली होती. त्यांचे हे वागणे बीसीसीआयच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना पटले नाही. त्यामुळे कुंबळे यांना मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यानंतर बीसीसीआयने वीरेंद्र सेहवागला स्पर्धेत आणून कुंबळेला शह देण्याची रणनीती आखल्याची चर्चाही रंगली आहे. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने वीरेंद्र सेहवागशी संपर्क साधल्याचे सांगितले होते. आयपीएल स्पर्धेदरम्यान आम्ही सेहवागशी संपर्क साधला आणि त्याला मुख्य प्रशिक्षक पदासाठी अर्ज करण्याची विनंती केली. सेहवागसोबत अन्य माजी क्रिकेटपटूंशीही आम्ही संपर्क साधल्याचे बीसीसीआयमधील एका अधिकाऱ्याने सांगितले. मात्र, सेहवागने हे वृत्त फेटाळून लावले होते.