मुंबई-महाराष्ट्राची अस्सल ‘ठस्सन’ पहिल्या दिवसापासूनच सामन्याची लज्जत वाढवणारी ठरली. एकीकडे पूर्वार्धात आणि उत्तरार्धात महाराष्ट्राच्या गोलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळाले, तर दुसरीकडे चाचपडणाऱ्या मुंबईसाठी तेजाने तळपणाऱ्या ‘सूर्य’कुमार यादवची शतकी खेळी आशादायी ठरली. याचप्रमाणे तीन वर्षांच्या अंतराने मुंबईकडून रणजी पुनरागमन करणाऱ्या विनीत इंदुलकरने संधीचे सोने करणारी अर्धशतकी खेळी साकारली. त्यामुळेच गतविजेत्या मुंबई संघाला वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या रणजी करंडक क्रिकेट स्पध्रेतील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात पहिल्या दिवसअखेर ७ बाद ३०६ अशी समाधानकारक मजल मारता
आली.
वेगवान गोलंदाजांना अनुकूल ठरणाऱ्या हिरव्यागार खेळपट्टीवर महाराष्ट्राने नाणेफेक जिंकल्यावर प्रथम गोलंदाजीचा निर्णय प्रारंभी फलदायी ठरला आणि मुंबईची ४ बाद १०१ अशी दैना उडाली. परंतु यादवने धावांचा दुष्काळ संपवणारे आपले शतक साजरे केले. तसेच तीन हंगामांच्या विश्रांतीनंतर हिमाचल प्रदेशाकडून मुंबईकडे परतणाऱ्या इंदुलकरने ८२ (१३ चौकारांसह) धावा काढत त्याला छान साथ दिली. त्यामुळेच मुंबईचा डाव सावरला. यादव आणि इंदुलकर जोडीने चौथ्या विकेटसाठी २६१ चेंडूंत १९६ मिनिटांत १८३ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली.
उत्तरार्धात महाराष्ट्राच्या वेगवान गोलंदाजांनी पुन्हा सामन्यावर नियंत्रण मिळवले. अनुपम संकलेचाने इंदुलकर आणि यादव या मुंबईच्या दोन्ही फलंदाजांना तंबूची वाट दाखवली, तर समद फल्लाहने शार्दूल ठाकूरला बाद केले. खेळ थांबला तेव्हा इक्बाल अब्दुल्ला ९ आणि कर्णधार झहीर खान ५ धावांवर खेळत होते.
 या हंगामात फक्त दोन अर्धशतके झळकावणाऱ्या यादवला या हंगामातील पहिले आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमधील चौथे शतक बाद फेरीत साकारता आले. तो ५० धावांवर असताना अक्षय दरेकरच्या गोलंदाजीवर महाराष्ट्राचा यष्टिरक्षक रोहित मोटवाणीने त्याला यष्टिरक्षण करण्याची संधी गमावली, परंतु नंतर २३ वर्षीय यादवने तब्बल १५व्या सामन्यात दोन वर्षांनी आपले शतक साकारले. २०९ मिनिटे आणि १२० चेंडूंत यादवने १८ चौकारांसह आपली १२० धावांची खेळी उभारली. महाराष्ट्राकडून फल्लाह आणि संकलेचा या दोघांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. त्याआधी, मुंबईचा अनुभवी फलंदाज वसिम जाफरने (४४) संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु उपाहारापूर्वी अखेरच्या चेंडूवर त्याचा संयम सुटला आणि श्रीकांत मुंडेच्या गोलंदाजीवर मिड-ऑनला अंकित बावणेकडे झेल देऊन तो माघारी परतला.
संक्षिप्त धावफलक
मुंबई (पहिला डाव) : ८४ षटकांत ७ बाद ३०६ (वसिम जाफर ४४, विनीत इंदुलकर ८२, सूर्यकुमार यादव १२०; समद फल्लाह ३/७१, अनुपम संकलेचा ३/५५). वि. महाराष्ट्र.

बाद फेरीत योग्य वेळी शतक साकारल्याचा आनंद -यादव
मुंबई : ‘‘बाद फेरीत योग्य वेळी शतक साकारता आले, हे माझ्यासाठी आनंददायी आहे. मी आणि विनीत इंदूलकर फलंदाजी करीत असताना संघाला आणखी मोठी धावसंख्या कशी रचून देता येईल याची वारंवार चर्चा केली,’’ असे सूर्यकुमार यादवने सामन्यानंतर सांगितले.
‘‘दुसरा नवा चेंडू इतका धोकादायक असेल अशी आम्हाला अपेक्षा नव्हती. खेळपट्टी ही वेगवान गोलंदाजांना अनुकूल अशी आहे,’’ असे तो पुढे म्हणाला.

रणजी वृत्तांत
भज्जी की बल्ले बल्ले!
बडोदा : जम्मू आणि काश्मीरसारख्या नवख्या संघाबरोबरच्या उपांत्यपूर्व सामन्यात पंजाबची ७ बाद १४६ अशी अवस्था असताना कर्णधार हरभजन सिंग फलंदाजीला आला आणि त्याने अप्रतिम ९२ धावांची खेळी साकारली. त्याने ही अप्रतिम खेळी ७९ चेंडूंत ८ चौकार आणि ६ षटकारांच्या जोरावर सजवली. या वेळी त्याने संदीप शर्माच्या (५१) साथीने आठव्या विकेटसाठी १०५ धावांची भागीदारी रचली. पंजाबचा पहिला डाव ३०४ धावांमध्ये संपुष्टात आणल्यावर पहिल्या दिवस अखेर जम्मू आणि काश्मीर संघाची १ बाद ११ अशी स्थिती आहे.

बंगाल ८ बाद २७४
कोलकाता : कट्टर प्रतिस्पर्धी रेल्वेविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात यजमान बंगालने पहिल्या दिवसअखेर ९० षटकांत ८ बाद २७४ अशी मजल मारली आहे. बंगालच्या सुदीप चॅटर्जीने १९ चौकारांच्या जोरावर ९६ धावांची दमदार खेळी साकारली. त्याचबरोबर अभिमन्यू इस्वरन (६५) आणि वृद्धिमान साहा (नाबाद ६०) यांच्याही खेळी महत्त्वपूर्ण ठरल्या.

कर्नाटक ५ बाद २९७
बंगळुरु : ३ बाद १५ अशी अवस्था असताना रॉबिन उथप्पा आणि करुण नायर यांच्या शतकांच्या जोरावर कर्नाटकने ५ बाद २९७ अशी दमदार मजल मारली आहे. उथप्पाने १९ चौकारांच्या जोरावर १०० धावांची खेळी साकारली, तर नायरने १४ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर १०० धावा केल्या. सी.एम. गौतमनेही १४ चौकारांच्या जोरावर नाबाद ८९ धावांची खेळी साकारली असून त्याच्याकडून कर्नाटकला तिसऱ्या शतकाची अपेक्षा असेल.