टोनी ग्रेग, डॉन ब्रॅडमॅन, लता मंगेशकर ही सगळी दिग्गज मंडळी एका घरात- कसं शक्य आहे? वाटणं साहजिक आहे. पण हे खरं आहे. श्रीलंकेतल्या एका क्रीडा आणि कलाप्रेमी घरात हा योग जुळून आला आहे. टोनी ग्रेग, स्टीव वॉ, डॉन ब्रॅडमॅन आणि लॅरी गोम्स- ही चार भावंडांची नावं आहेत. या चार भावंडांच्या आईचं नाव- लता मंगेशकर आहे. टोनीच्या घरातील तरुण भावंडांची नावं ब्रायन लारा, ब्रेट ली आणि फ्लेमिंग अशी आहेत. फ्लेमिंग नाव न्यूझीलंडचा माजी कर्णधार स्टीफन फ्लेमिंग का ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज डॅमियन फ्लेमिंग याच्यावरून ठेवलंय ते माहिती नाही. ‘क्रिकहब’च्या संदीपन बॅनर्जी यांनी या अनोख्या कुटुंबाशी संवाद साधला.
अनोख्या नावांचं हे कुटुंब. यामागची गोष्ट आणखी रंजक. १९वर्षीय टोनी हा या भावंडात सगळ्यात लहान. तो क्रिकेट खेळतो. न्युवारा एलियाचा टोनी वेगवान गोलंदाज आहे. तामिळ युनियन क्रिकेट आणि अॅथलेटिक क्लबसाठी क्रिकेट खेळतो. त्याच्या कुटुंबीयांनी परिस्थितीशी संघर्ष करत वाटचाल केली. क्रिकेट त्यांच्या घरात सगळ्यांना आवडायचं. पण व्यावसायिक पातळीवर ते खेळण्यासाठी अकादमी किंवा जिमखाने अशी सुविधा नव्हती. जोसेफ लिओ डॉमिनिक यांनी कुटुंब वाढवताना आपल्या मुलांना दिग्गज क्रिकेटपटूंची नावं दिली.
टोनीचा जन्म २००७चा. त्याचवर्षी भारताने पहिलावहिला टी२० वर्ल्डकप जिंकला. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने इतिहास घडवला. जोसेफ यांना सगळ्यात लहान मुलाचं नाव धोनी ग्रेग ठेवायचं होतं. मात्र अनपेक्षित गोष्टी घडल्या. तामीळ पार्श्वभूमी असलेल्या या कुटुंबात धोनीचं टोनी झालं. टोनी ग्रेग असंच नाव झालं. इंग्लंडचे माजी कर्णधार असलेले ग्रेग क्रिकेटविश्वातल्या नाणावलेल्या समालोचकांपैकी एक आहेत.
टोनी लहानाचा मोठा होत असताना त्याला आपल्या नावाचं महत्त्व ठाऊकच नव्हतं. त्याच्या भावंडांची नावं डॉन ब्रॅडमॅन, स्टी वॉ, लॅरी गोम्स अशी होती. ही मंडळी कोण हे जाणण्याचं त्याचं वय नव्हतं. मोठा झाल्यावर त्याला या नावांची महती कळली.
टोनीने कँडी शहरात लेदर बॉल क्रिकेट खेळायला सुरुवात केली. त्यावेळी टोनी ग्रेग हे नाव ऐकून त्याला विचारणा होऊ लागली. लोक टोनीला त्याच्या आईवडिलांचं नाव विचारत. भावंडांची नावं विचारत.
डॉन ब्रॅडमन कोण आहे?
तुझ्या भावाला स्टी वॉ का म्हणतात?
तुमच्या घरात सगळ्यांची नावं क्रिकेटपटूंचीच कशी?
ही मंडळी कोण याचा शोध टोनीने घेतला. या नावांमागची महती त्याला कळू लागली. डॉन ब्रॅडमॅन यांना क्रिकेटविश्वातला सर्वोत्कृष्ट फलंदाज असं म्हटलं जातं. ऑस्ट्रेलियाचा स्टीव वॉ त्याच्या बेडर नेतृत्वासाठी ओळखला जातो. लॉरी गोम्स हे वेस्ट इंडिजचे महान फलंदाज होते. ब्रेट ली हा जगभरातल्या फलंदाजांसाठी कर्दनकाळ असा गोलंदाज होता हे सगळं टोनीला हळूहळू समजलं. आतापर्यंत भावंडांना तो या नावाने सहज हाक मारत असे. हे खेळाडू कोण हे समजल्यानंतर किती मोठा वारसा नावरुपात का होईना आपल्या घरातून चालवला जात आहे याची जाणीव टोनीला झाली.
टोनी खऱ्या अर्थाने क्रिकेटचा वारसा पुढे नेतो आहे. बाकीच्या भावांनी आपापली करिअरची वाट निवडली आहे. टोनी सध्या श्रीलंकेत क्लब क्रिकेटमध्ये पाय रोवत आहे. उत्तम वेगात गोलंदाजी करणं ही त्याची खासियत आहे. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये स्वत:ला सिद्ध केल्यानंतर भविष्यात तो श्रीलंकेसाठी खेळताना दिसू शकतो.
समालोचक टोनी ग्रेग हे जगभरात लोकप्रिय होते, आहेत. श्रीलंकेतही त्यांचा खास चाहता वर्ग आहे. या टोनी ग्रेगच्या बाबतीतही हे घडू शकतं. समजा तो श्रीलंकेसाठी खेळायला उतरला तर त्याची भावंडं- डॉन ब्रॅडमॅन, स्टीव वॉ, लॉरी गोम्स मैदानात उपस्थित असतील. टोनी ग्रेगचा खेळ बघायला ब्रॅडमन हा अनोखा योग जुळून येईल.
