Top 5 Heroes of Team India Victory: आयसीसी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाने सुरूवातीपासूनस चॅम्पियनसारखा खेळ केला. स्पर्धेतील अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यातही भारतीय संघाने चॅम्पियनसारखा खेळ केला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडसमोर विजयासाठी २५६ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडला १५९ धावांपर्यंत मजल मारता आली. हा सामना भारताने ९६ धावांनी आपल्या नावावर केला. दरम्यान अंतिम सामन्यात कोणत्या ५ खेळाडूंनी दमदार कामगिरी केली? जाणून घ्या.
संजू सॅमसन
संजू सॅमसनला या स्पर्धेतील काही मोजकेच सामने खेळण्याची संधी मिळाली. पण या सर्व सामन्यांमध्ये संजू सॅमसनने आपली छाप सोडली. वेस्ट इंडिजविरूद्ध झालेल्या सुपर ८ फेरीतील शेवटच्या सामन्यात नाबाद ९७ धावांची खेळी केली होती. त्यानंतर इंग्लंडविरूद्ध झालेल्या सेमी फायनलच्या सामन्यात त्याने ८९ धावांची खेळी केली होती. या दोन्ही सामन्यात त्याला शतक झळकावण्याची संधी होती. पण ही संधी थोडक्यात हुकली होती. अंतिम सामन्यातही त्याला शतक झळकावण्याची संधी होती. पण ८९ धावांवर फलंदाजी करत असताना मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात तो बाद होऊन माघारी परतला. हे त्याचं या स्पर्धेतील लागोपाठ तिसरं अर्धशतक ठरलं.
इशान किशन
इशान किशन या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आला होता. अभिषेक शर्मा बाद होऊन माघारी परतल्यानंतर इशान किशनने संजू सॅमसनसोत मिळून डाव सांभाळला. दोघांनी मिळून १०० हून अधिक धावांची भागीदारी केली. इशानने २५ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांच्या साहाय्याने ५४ धावांची खेळी केली.
शिवम दुबे
टी-२० क्रिकेटमध्ये शिवम दुबेची भूमिका अतिशय महत्वाची ठरते. इंग्लंडविरूद्ध झालेल्या सामन्यात त्याने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन ४३ धावांची वादळी खेळी केली होती. न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यात त्याला सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येण्याची संधी मिळाली. शेवटच्या षटकांमध्ये फलंदाजी करताना त्याने ८ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांच्या साहाय्याने नाबाद २६ धावांची खेळी केली.
जसप्रीत बुमराह
फलंदाजांनी आपलं काम योग्यरित्या पूर्ण केलं होतं. त्यामुळे सर्व जबाबदारी गोलंदाजांवर होती. आव्हान मोठं होतं. पण न्यूझीलंडच्या ताफ्यातही एकापेक्षा एक स्फोटक फलंदाज होते. त्यांना लवकर बाद केलं नसतं. तर टीम इंडियाचं टेन्शन वाढलं असतं. त्यामुळे सूर्यकुमार यादवने जसप्रीत बुमराहला लवकर गोलंदाजीला बोलवलं. बुमराहने पहिल्याच चेंडूवर रचिन रवींद्रला बाद करत माघारी धाडलं. बुमराहने या सामन्यात गोलंदाजी करताना ४ षटकात १५ धावा खर्च करून ४ गडी बाद केले.
अक्षर पटेल
अक्षर पटेल हा भारतीय संघाच्या ऐतिहासिक विजयाचा खरा अनसंग हिरो ठरला. गेल्या सामन्यात २ भन्नाट कॅच पकडून भारताचा विजय खेचून आणणाऱ्या अक्षरला या सामन्यात फलंदाजीला येण्याची संधी मिळाली नाही. पण गोलंदाजी करताना त्याने न्यूझीलंडला लागोपाठ धक्के दिले. आधी फिन अॅलेनला अवघ्या ९ धावांवर झेलबाद करून माघारी धाडलं. त्यानंतर ग्लेन फिलिप्सची दांडी गुल केली. अक्षरने या सामन्यात ३ गडी बाद केले.
