विंडसर पार्क स्टेडियममध्ये खेळवल्या गेलेल्या तिसऱ्या आणि निर्णायक कसोटीत पाकिस्तानने वेस्ट इंडिजला १०१ धावांनी पराभूत केलं. या विजयासह पाकिस्तानचा कर्णधार मिसबाह-उल-हकने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. पाकिस्तानने कसोटी मालिका २-१ ने जिंकली. मालिका विजयाने करिअरचा शेवट होत असल्याचा आनंद मिसबाहने यावेळी व्यक्त केला. खरंतर मालिकेला सुरूवात होण्याआधीच मिसबाहने आपल्या निवृत्तीची घोषणा केली होती.

सामना संपल्यानंतर मिसबाहने आपल्या भाषणात सर्वांचे आभार मानले. ”मला आजवर माझ्या करिअरमध्ये ज्या गोष्टी मिळाल्या त्याबद्दल सर्वप्रथम मी ईश्वराचे आभार मानतो. कसोटी कारकिर्दीचा शेवट विजयाने होत आहे याचा खूप आनंद आहे. माझे कुटुंबिय, आई, बहिण आणि विशेषत: पत्नी उजमाकडून मिळालेल्या पाठिंब्यामुळे मी क्रिकेटमध्ये टिकू शकलो. या सर्वांचा मी आभारी आहे. खरंतर ही मालिका मी खास माझ्या पत्नीच्या आग्रहाखातर खेळलो. मी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेनंतरच करिअरचा शेवट करणार होतो.”, असे मिसबाह म्हणाला.

मिसबाहने आपल्या कसोटी कारकिर्दीमध्ये ५६ कसोटी सामन्यांमध्ये पाकिस्तानच्या संघाचे नेतृत्त्व केले आहे. त्याच्या नेतृत्त्वात पाकिस्तानने २६ कसोटी सामने जिंकले तर १९ कसोटींमध्ये पराभव पत्करावा लागला. ११ कसोटी सामने अनिर्णीत राहिले. विशेष म्हणजे, मिसबाहच्या कर्णधारी काळातच पाकिस्तानचा संघ आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर राहिला होता. मिसबाहने १६२ वनडे सामन्यांमध्ये ६९४५ धावा केल्या आहेत. यात ७३.७५ च्या स्ट्राईक रेटने ४२ अर्धशतकांचा समावेश आहे. कसोटी करिअरचा विचार केला असता मिसबाहच्या नावावर ५२२२ धावा जमा असून यात १० शतकांचा आणि तब्बल ३९ अर्धशतकांचा समावेश आहे.