नवी दिल्ली : भारताच्या बिगरमानांकित ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद जोडीने मंगळवारी जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेतील महिला दुहेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. महिला एकेरीत उन्नती हुडा आणि पुरुष एकेरीत लक्ष्य सेन यांनीही विजयी सुरुवात केली.
मंगळवारी दुपारीच ट्रीसा-गायत्री यांना प्रतिष्ठेचा ‘अर्जुन’ पुरस्कार जाहीर झाला. त्यानंतर घरच्या प्रेक्षकांसमोर खेळताना या जोडीने सनसनाटी निकालाची नोंद करताना १६व्या मानांकित अमेरिकेच्या लॉरेन लॅम आणि ॲलिसन क्वीन जोडीचा अवघ्या ३८ मिनिटांत २१-१५, २१-१२ असा पराभव केला.महिला एकेरीत उन्नती हुडाने म्यानमारच्या थेट हतार थुझारचा २२-२०, २१-१६ असा पराभव करून दुसर्या फेरीत प्रवेश केला. लक्ष्य सेनने ऑ्ट्रिरयाच्या कॉलिन्स व्हॅलेंटाईन फिलिमॉनला १६-२१, २१-८, २१-४ असे नमवले.
महिला दुहेरीतील भारताची अन्य जोडी कविप्रिया सेल्वम आणि सिमरन सिंघीचे आव्हान दुसर्या फेरीत संपुष्टात आले. बल्गेरियाच्या नवव्या मानांकित गॅब्रिएला स्टोएवा आणि स्टेफनी स्टोएवा जोडीने भारतीय जोडीचा अवघ्या ३२ मिनिटांत २१-७, २१-१४ असा पराभव केला. मिश्र दुहेरीत रोहन कपूर आणि ऋत्विका शिवानी गड्डे, तसेच आशिथ सूर्या आणि अमृता प्रमुथेश यांना पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला.
