विश्वचषक क्रिकेट स्पर्धा महिन्याभराच्या अंतरावर येऊन ठेपली आहे. या स्पध्रेची रंगीत तालीम म्हणून पाहिल्या जाणाऱ्या तिरंगी एकदिवसीय क्रिकेट स्पध्रेला शुक्रवारी होणाऱ्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड लढतीने प्रारंभ होत आहे.
भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत २-० असा दमदार विजय मिळवल्यानंतर आत्मविश्वास दुणावलेला ऑस्ट्रेलियाचा संघ सिडनी क्रिकेट मैदानावर परंपरागत प्रतिस्पर्धी इंग्लंडशी सामना करणार आहे. यानंतर रविवारी मेलबर्नवर विश्वविजेत्या भारताशी ते झुंजणार आहेत.
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या विश्वचषकाला सामोरे जाण्यापूर्वी तिन्ही संघांचा चांगला सराव या स्पध्रेमुळे होणार आहे. इंग्लंडचा संघ तिरंगी स्पध्रेत नवा कर्णधार ईऑन मॉर्गनसह उतरणार आहे. विश्वचषकाला दोन महिने असताना इंग्लंडने गंभीर निर्णय घेत अ‍ॅलिस्टर कुकच्या जागी मॉर्गनकडे नेतृत्वाची धुरा सोपवली आहे. मॉर्गनच्या नेतृत्वाखाली कॅनबेरा येथे झालेल्या दोन सराव सामन्यांत इंग्लंडने एकूण ७५५ धावा काढल्या. इयान बेलसुद्धा झंझावाती फॉर्मात असून, त्याने १४५ चेंडूंत साकारलेल्या १८७ धावांच्या खेळीमुळे इंग्लंडला पंतप्रधान इलेव्हन संघावर ६० धावांनी विजय मिळवला होता. परंतु मॉर्गन मात्र धावांसाठी झगडताना दिसत आहे. मागील १९ एकदिवसीय सामन्यांत त्याने फक्त एकमेव अर्धशतक नोंदवले आहे.
इंग्लंडची एकदिवसीय कामगिरीसुद्धा गेल्या काही दिवसांत चांगली झालेली नाही. घरच्या मैदानावर त्यांनी श्रीलंका आणि भारताविरुद्धच्या मालिका गमावल्या. मग श्रीलंकेतील एकदिवसीय मालिकेतसुद्धा त्यांनी हार पत्करली.
संभाव्य विश्वविजेता गणला जाणारा ऑस्ट्रेलियाचा संघ कर्णधार मायकेल क्लार्कशिवाय तिरंगी स्पध्रेत उतरत आहे. क्लार्क मांडीच्या स्नायूंच्या दुखापतीतून अद्याप सावरलेला नाही. त्यामुळे ट्वेन्टी-२० कर्णधार जॉर्ज बेलीकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे. इंग्लंडप्रमाणे ऑस्ट्रेलियालासुद्धा या तिरंगी स्पध्रेच्या निमित्ताने खेळाडूंना आजमावण्याची संधी मिळणार
आहे.

संघ
ऑस्ट्रेलिया : जॉर्ज बेली (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, पॅट कमिन्स, झेव्हियर डोहर्टी, जेम्स फॉल्कनर, आरोन फिन्च, ब्रॅड हॅडिन, जोश हॅझलवूड, मिचेल जॉन्सन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर, शेन वॉटसन, गुरिंदर संधू.
इंग्लंड : ईऑन मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, जेम्स अँडरसन, गॅरी बॅलन्स, इयान बेल, रवी बोपारा, स्टुअर्ट ब्रॉड, जोस बटलर, स्टीव्हन फिन, अ‍ॅलेक्स हेल्स, ख्रिस जॉर्डन, जो रूट, जेम्स टेलर, जेम्स ट्रेडवेल, ख्रिस वोक्स.