चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत अपराजित राहून भारताने जेतेपदाला गवसणी घातली तेव्हा त्यांना कोणताही संघ पराभूत करू शकत नाही, असे वाटत होते. पण वेस्ट इंडिजमधील तिरंगी मालिकेत सारेच चित्र पालटले आणि वेस्ट इंडिजनंतर श्रीलंकेने दणदणीत विजय मिळवल्यावर आठवडय़ाभरापूर्वी आकाशात चमकणारे तारे जमिनीवर आले. श्रीलंकेच्या महेला जयवर्धने आणि उपुल थरंगा यांनी २१३ धावांची सलामी दिल्यामुळे श्रीलंकेला भारतापुढे ३४९ धावांचे आव्हान ठेवता आले. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा संघ १८७ धावांवर आटोपला आणि श्रीलंकेने १६१ धावांनी दणदणीत विजय मिळवला.
 प्रथम फलंदाजी करताना सामनावीर ठरलेल्या थरंगाने कारकीर्दीतील सर्वोत्तम अशी नाबाद १७४ धावांची खेळी साकारली, त्याला जयवर्धनेने १०७ धावा करीत चांगली साथ दिली. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाचा डाव कोसळला. मोठे फटके मारण्याच्या नादात भारताने आपले फलंदाज गमावले आणि स्पर्धेतील सलग दुसरा पराभव पाहावा लागला.
संक्षिप्त धावफलक
श्रीलंका : ५० षटकांत १ बाद ३४८ (उपुल थरंगा नाबाद १७४, महेला जयवर्धने १०७; आर. अश्विन १/६७) विजयी वि. भारत : ४४.५ षटकांत सर्व बाद १८७ (रवींद्र जडेजा नाबाद ४९; रंगना हेराथ ३/३७)
सामनावीर : उपुल थरंगा.
 ‘‘हा पराभव म्हणजे वास्तवाची चाचपणी असल्याचे मला वाटते. नेमके काय चुकले, याचा अभ्यास करून चुका आम्हाला सुधारायला हव्यात. अजूनही आमच्या हातात दोन सामने आहेत. ’’
विराट कोहली, भारताचा कर्णधार
 ‘‘मोठय़ा विजयाची आम्हाला गरज होती. महेलाने त्याचा दर्जा दाखवून दिला, थरंगा सुरुवातीला अडखळत खेळत असला तरी त्याने सर्वोत्तम फलंदाजी केली. २५० धावा आमच्यासाठी पुरेशा होत्या ’’
अँजेलो मॅथ्यूज, श्रीलंकेचा कर्णधार.