नाशिक – अनुसूचित जमातीतील विद्यार्थिनींच्या खेळातील प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी आदिवासी विकास विभागाकडून विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याचा एक भाग म्हणून एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल्सच्या ३५ विद्यार्थिनींसाठी गडचिरोलीमध्ये नऊ दिवसांच्या क्रिकेट कोचिंग कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशिक्षणानंतर या आदिवासी कन्या क्रिकेटचे मैदान गाजविताना दिसणार आहे.
आदिवासी विकास आयुक्त तथा महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कूल सोसायटी (नाशिक) च्या सदस्य सचिव लीना बनसोड यांच्या संकल्पनेतून गडचिरोली जिल्ह्यात ‘ईएमआरएस’ गर्ल्स क्रिकेट टीम स्थापन करण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाला प्रकल्प अधिकारी अरुण एम. यांचे मार्गदर्शन लाभत आहे. कॅम्पचे उद्घाटन गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्या हस्ते झाले.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भोयर, नितीन पाटील, प्राचार्य परशुराम वांगदरे, धर्मेंद्र ठाकूर, मुख्याध्यापिका वंदना महल्ले आदी उपस्थित होते. आदिवासी खेळाडूंनी मॅरेथॉन, खो-खो, कबड्डी आदी क्रीडा प्रकारात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर नेत्रदीपक कामगिरी केलेली आहे. आता ते क्रिकेटमध्येही चमकणार आहेत.
क्रिकेट कोचिंग कॅम्पमध्ये गडचिरोली जिल्ह्यातील सात एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल्सच्या प्रत्येकी पाच विद्यार्थिनींनी सहभागी झाल्या आहेत. या शिबिरामुळे आदिवासी विद्यार्थिनींना क्रिकेट क्षेत्रात आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. भविष्यात जिल्हास्तर, राज्यस्तरावर आणि पुढे राष्ट्रीय स्तरावरही ‘ईएमआरएस’ गर्ल्स क्रिकेट टीम चमकदार कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
आदिवासी विद्यार्थिनींच्या सशक्तीकरणासाठी खेळ हा एक प्रभावी माध्यम असल्याचे आदिवासी विकास आयुक्त लीना बनसोड यांनी म्हटले आहे. ईएमआरएस’ महिला संघाची निर्मिती ही केवळ क्रिकेटसाठी नाही, तर लिंग समानता, आत्मविश्वास आणि मुख्य प्रवाहात सहभागासाठी आहे. शिबिरात क्रिकेटच्या मूलभूत कौशल्यांपासून ते तांत्रिक स्तरापर्यंत प्रशिक्षण दिले जा त असून भविष्यातील यशस्वी खेळाडू येथूनच उदयास येतील, असा विश्वास बनसोड यांनी व्यक्त केला.
मूलभूत कौशल्यांचा सराव
नऊ दिवसांच्या कोचिंग कॅम्पमध्ये विद्यार्थिनींकडून क्रिकेटच्या मूलभूत कौशल्यांचा (बेसिक स्किल्स) सराव करून घेतला जात आहे. प्रशिक्षक आणि क्रीडा शिक्षिका या फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण यासारख्या तांत्रिक बाबींवर विशेष भर देत आहेत. कॅम्पमध्ये विद्यार्थिनींचा उस्फूर्त प्रतिसाद लाभत असून, त्या क्रिकेटचा आनंद घेत आहे.
