India vs New Zealand 5th T20I Turning Point: भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये पार पडलेल्या ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील सुरूवातीच्या तिन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवून भारतीय संघाने मालिकेत विजयी आघाडी घेतली होती. पण त्यानंतर झालेल्या पुढील दोन्ही सामन्यांमध्ये न्यूझीलंडकडून पलटवार पाहायला मिळाला. मालिकेतील पाचव्या सामन्यात न्यूझीलंडने ७ गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात धावांचा पाठलाग करताना टीम सेफर्टने ९७ धावांची खेळी केली आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यात धावांचा बचाव करताना नमन धीरने केलेली एक चूक भारतीय संघाला चांगलीच महागात पडली. नेमकं काय घडलं? जाणून घ्या.
क्रिकेटमध्ये कॅचेस वीन द मॅचेस असं म्हटलं जातं. या सामन्यात एक कॅच सोडणं टीम इंडियाला चांगलंच महागात पडलं आहे. १९२ धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंडला अर्शदीप सिंगने सुरूवातीलाच मोठा धक्का दिला होता. त्याने फिन अॅलेनला दुसऱ्याच षटकात बाद करत माघारी धाडलं. त्यानंतर चौथ्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर सेफर्टने मोठा फटका मारला, पण फटका फसला. त्यामुळे सेफर्टला बाद करण्याची संधी निर्माण झाली होती. पण नमन धीरच्या हातून कॅच सुटली. ही कॅच टीम इंडियाला चांगली महागात पडली. कारण कॅच सुटली त्यावेळी सेफर्ट अवघ्या १३ धावांवर फलंदाजी करत होता. त्यानंतर त्याने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला आणि ९३ धावांची खेळी केली. जर नमन धीरने कॅच पकडला असता, तर सामन्याचा निकाल वेगळा लागू शकला असता.
न्यूझीलंडचा दमदार विजय
या सामन्यात न्यूझीलंडला विजयासाठी १९२ धावांची गरज होती. धावांचा पाठलाग करताना फिन अॅलेन अवघ्या २ धावांवर माघारी परतला. त्यानंतर सेफर्ट आणि मिचेलने मिळून न्यूझीलंडचा डाव सावरला. मिचेलने २९ धावांचे योगदान दिले. त्यानंतर ग्लेन फिलिप्स आणि सेफर्टने मिळून भारतीय गोलंदाजांचा समाचार घेतला. ग्लेन फिलिप्स ६५ धावांवर नाबाद राहिला. तर सेफर्चने ९३ धावांची खेळी केली. न्यूझीलंडने हा सामना ७ गडी राखून आपल्या नावावर केला.
सामना गमावला, पण मालिकेवर ३-२ ने कब्जा
भारतीय संघाने हा सामना गमावला, पण टी-२० मालिकेत ३-२ ने विजय मिळवला आहे. मालिकेतील सुरूवातीच्या तिन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाने विजयाने सुरूवात केली होती. पण त्यानंतर झालेल्या पुढील दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. मालिकेतील चौथा सामना भारतीय संघाने धावांचा पाठलाग करताना गमावला होता. तर पाचवा सामना धावांचा बचाव करताना गमावला आहे.
