Ranji Trophy 2026 Mumbai vs Chandigarh Tushar Deshpande: मराठमोळा गोलंदाज तुषार देशपांडेने रणजी ट्रॉफी स्पर्धेत हॅटट्रिक घेतली आहे. विक्रमी सर्वाधिक वेळेस रणजी ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबई संघाने या स्पर्धेच्या नवीन हंगामाची शानदार सुरुवात केली आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या सामन्यात, यजमान संघाने फलंदाजी करताना एकूण ४२९ धावांची मजल मारली; त्यानंतर, तुषार देशपांडेने हॅटट्रिक घेत पाहुण्या चंदीगड संघाची दाणादाण उडवली.

तुषार देशपांडेच्या भेदक गोलंदाजीपुढे चंदीगडने अवघ्या ३७ धावांत सात विकेट्स गमावल्या. तुषारने कमालीची हॅट्ट्रिक साधून इतिहास आपल्या नावे केला आहे. रणजी ट्रॉफी स्पर्धेत हॅट्ट्रिक घेणारा तो मुंबईचा सहावा गोलंदाज ठरला आहे.

आपल्या पहिल्या डावात फलंदाजीसाठी उतरलेल्या चंदीगड संघाला तुषार देशपांडेने सातव्या षटकात पहिला धक्का दिला. त्यानंतर त्याने आपली भेदक गोलंदाजी कायम ठेवली. ११ व्या षटकात सलग तीन चेंडूंवर तीन फलंदाजांना बाद करून हॅट्ट्रिक घेतली. देशपांडेने ११ व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर अर्जुन आझादला बाद केलं, त्यानंतरच्या चेंडूवर शुभम भामरीला माघारी धाडलं आणि पाचव्या चेंडूवर दिपेंदर कुशची विकेट घेत आपल्या हॅटट्रिकचा आनंद साजरा केला.

मुंबई आणि छत्तीसगड यांच्यात सध्या रणजी ट्रॉफी ‘एलिट गट डी’मधील सामना सुरू आहे. प्रथम फलंदाजी करताना मुंबई संघाने एकूण ४२९ धावा केल्या. यामध्ये मुशीर खानने ६५, सिद्धेश लाडने ८६, तनुष कोटियनने ५८ आणि मोहित अवस्थीने ५६ धावांचं योगदान दिलं. कोणत्याही फलंदाजाने मोठी वैयक्तिक खेळी केली नसली तरीही सर्वांच्या एकत्रित योगदानामुळे संघाला मोठी धावसंख्या उभारता आली. सलामीवीर आणि स्टार खेळाडू यशस्वी जैस्वाल मात्र खाते न उघडताच बाद झाला.

छत्तीसगडने आठ बळी गमावले तोपर्यंत तुषार देशपांडेने त्यातील पाच बळी आपल्या नावावर केले होते. त्याने केवळ सात षटकं गोलंदाजी करत १७ धावा दिल्या आणि संघातील निम्म्या खेळाडूंना बाद केलं. छत्तीसगढच्या संघाने ८ विकेट्स गमावले तेव्हा १०० धावांचा टप्पाही गाठला नव्हता. अखेरीस चंदीगढचा संघ ७८ धावांवर सर्वबाद झाल्यानंतर मुंबई संघाने त्यांना फॉलोऑन दिला आहे. आता दुसऱ्या डावात संघ किती धावा करणार यावर सर्वांच्या नजरा आहेत.