विजयासाठी मिळालेल्या ३६३ धावांच्या प्रचंड लक्ष्यासमोर खेळताना ऑस्ट्रेलिया अ संघाच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. पुदुच्चेरी इथे सुरू असलेल्या पहिल्या अनधिकृत कसोटीत भारतीय अ संघाने भेदक मारा करत ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २०० धावांत गुंडाळला आणि १६२ धावांनी विजय साजरा केला. दुसरी कसोटी याच मैदानावर २९ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे.

तिसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने दोन विकेट्स गमावल्या होत्या. चौथ्या आणि अंतिम दिवशी अनुभवी फलंदाज पीटर हँड्सकॉम्बकडून ऑस्ट्रेलियाला मोठ्या अपेक्षा होत्या मात्र अंशुल कंबोजच्या खाली राहिलेल्या चेंडूवर तो त्रिफळाचीत झाला. अंशुलच्या अचानक उसळी मिळालेल्या चेंडूवर नॅथन मॅकस्विनी बाद झाला. त्याने ७५ चेंडूत ३५ धावांची खेळी केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव असलेल्या जोशुआ फिलीपला तुषार देशपांडेने बाद केलं. जेसन संघा तनुषच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. फर्ग्युस ओ नीलने ४७ धावा करत प्रतिकार केला पण तो अपुराच ठरला. मुंबईकर तुषार देशपांडे आणि शम्स मुलानी यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाच्या डावाला खिंडार पाडलं. अंशुल कंबोज आणि तनुष कोटियन यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेत त्यांना चांगली साथ दिली.

या मालिकेद्वारे राष्ट्रीय संघात पुनरागमन करण्यासाठी साई सुदर्शन प्रयत्नशील आहे. दुसरीकडे श्रीलंका दौऱ्यात साई सुदर्शन दुखापतग्रस्त असल्याने संधी मिळालेल्या देवदत्त पड्डीकलने यशस्वी नेतृत्व केलं आणि संयमी खेळीही केली. शम्स मुलानी आणि तनुष कोटियन यांनी अव्वल दर्जासाठी तय्यार असल्याचं दाखवून दिलं. ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय संघात स्थान पटकावण्यासाठी प्रयत्नशील पीटर हँड्सकॉम्ब आणि नॅथन मॅकस्विनी यांच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र ते अपयशी ठरले. भारतातच कसोटी पदार्पण केलेल्या टॉड मर्फीने चांगली गोलंदाजी करत प्रभावित केलं.

कुमार कुशाग्रचं शतक

२१वर्षीय कुमार कुशाग्रच्या खणखणीत शतकी खेळीच्या बळावर भारत अ संघाने ३३४ धावांची मजल मारली. दुलीप ट्रॉफी फायनलमध्ये शतकी खेळी करणाऱ्या कुमारने ऑस्ट्रेलियाच्या दर्जेदार आक्रमणाविरुद्ध संयमाने खेळ करत शतक साजरं केलं. कुमार आणि तनुष कोटियन यांनी ६व्या विकेटसाठी केलेली १३८ धावांची भागीदारी मोलाची ठरली. तनुषने ६९ तर सलामीवीर साई सुदर्शनने ५७ धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियातर्फे कोरे रॉचिलीने ४ तर टॉड मर्फीने ३ विकेट्स घेतल्या.

मुंबईकरांसमोर गारद

तनुष कोटियन, शम्स मुलानी आणि तुषार देशपांडे या मुंबईकरांसमोर ऑस्ट्रेलिया अ संघाच्या फलंदाजांनी लोळण घेतली. तनुष-शम्सच्या फिरकीचं कोडं त्यांना उमगलं नाही. तुषारनेही टिच्चून मारा केला. शम्सने ४ विकेट्स घेतल्या. जेसन संघाने ४६ धावांची खेळी केली.

कर्णधार पड्डीकलचा निर्धार

दुसऱ्या डावात भारतीय संघाचा डाव १९९ धावांतच आटोपला. कर्णधार देवदत्त पड्डीकलने ५९ धावांची संयमी खेळी केली. कुमार कुशाग्रने नाबाद ४६ धावा केल्या. ऑस्ट्रेलियातर्फे टॉड मर्फीने ४ विकेट्स घेतल्या.