वृत्तसंस्था, सिडनी : ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या जेतेपदासाठी प्रबळ दावेदार असलेल्या संघांतील सामन्यापासून शनिवारी ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील ‘अव्वल १२’ फेरीला प्रारंभ होईल. परंतु या सामन्यावर पावसाचे सावट आहे. गतवर्षी न्यूझीलंडला नमवत ऑस्ट्रेलियाने प्रथमच ट्वेन्टी-२० विश्वचषकाचे जेतेपद पटकावले होते. त्यामुळे न्यूझीलंडचा या पराभवाची परतफेड करण्याचा, तर ऑस्ट्रेलियाचा दमदार कामगिरी कायम राखण्याचा प्रयत्न असेल.

विल्यम्सनच्या कामगिरीवर नजर

न्यूझीलंडच्या डावाची सुरुवात अनुभवी मार्टिन गप्टिल आणि डेव्हॉन कॉन्वे करतील. परंतु तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या कर्णधार केन विल्यम्सनच्या कामगिरीवर सर्वाची नजर असेल. विल्यम्सनला गेल्या काही काळात अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. या वर्षांत सात ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये त्याला केवळ एक अर्धशतक करता आले आहे. त्यामुळे त्याचा कामगिरीत सुधारणेचा प्रयत्न असेल. गोलंदाजीत ट्रेंट बोल्ट, टीम साऊदी, लॉकी फग्र्युसनवर न्यूझीलंडची भिस्त असेल.

स्मिथ, मार्श की स्टोइनिस?

कर्णधार आरोन फिंच आणि डावखुरा डेव्हिड वॉर्नर ऑस्ट्रेलियासाठी सलामीवीराची भूमिका बजावतील. मधल्या फळीत ग्लेन मॅक्सवेल, टीम डेव्हिड आणि यष्टीरक्षक मॅथ्यू वेड यांचे स्थान पक्के मानले जाते आहे. अन्य दोन स्थानांसाठी स्टीव्ह स्मिथ, मिचेल मार्श आणि मार्कस स्टोइनिस यांच्यात स्पर्धा आहे. ऑस्ट्रेलियाकडे मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, जोश हेझलवूड व अ‍ॅडम झ्ॉम्पा असे तारांकित गोलंदाज आहेत.

  • वेळ : दु. ४.३० वा.
  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १,१ हिंदी