वॉर्नर, मार्शच्या अर्धशतकांमुळे विंडीजवर ८ गडी राखून मात

सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (५६ चेंडूंत नाबाद ८९) आणि मिचेल मार्श (३२ चेंडूंत ५३) यांनी साकारलेल्या अर्धशतकांमुळे ऑस्ट्रेलियाने शनिवारी ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत गतविजेत्या वेस्ट इंडिजवर ८ गडी आणि २२ चेंडू राखून मात केली. या विजयासह ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीसाठी आपली दावेदारी भक्कम केली.

या सामन्यात विंडीजने दिलेले १५८ धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाने १६.२ षटकांत गाठत चौथ्या विजयाची नोंद केली. सामन्यापूर्वीच आव्हान संपुष्टात आलेल्या विंडीजने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ७ बाद १५७ अशी धावसंख्या उभारली. एव्हिन लुईस (२९) आणि ख्रिस गेल (१५) हे विंडीजचे सलामीवीर चांगल्या सुरुवातीनंतर बाद झाले. मात्र, कर्णधार किरॉन पोलार्ड (४४), शिमरॉन हेटमायर (२७) आणि आंद्रे रसेल (नाबाद १८) यांनी विंडीजला दीडशे धावांचा टप्पा ओलांडून दिला.

१५८ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंच (९) स्वस्तात माघारी परतला. यानंतर वॉर्नर आणि मार्शने उत्कृष्ट फलंदाजी करताना दुसऱ्या गड्यासाठी १२४ धावांची भागीदारी रचल्याने ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला. सामनावीर वॉर्नरच्या नाबाद ८९ धावांच्या खेळीत नऊ चौकार आणि चार षटकारांचा समावेश होता.

संक्षिप्त धावफलक

वेस्ट इंडिज : २० षटकांत ७ बाद १५७ (किरॉन पोलार्ड ४४; जोश हेझलवूड ४/३९) पराभूत वि. ऑस्ट्रेलिया : १६.२ षटकांत २ बाद १६१ (डेव्हिड वॉर्नर नाबाद ८९, मिचेल मार्श ५३; ख्रिस गेल १/७)

ब्राव्होसह गेलची निवृत्ती?

विंडीजचा अष्टपैलू ड्वेन ब्राव्होने ट्वेन्टी-२० विश्वचषकानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्याच्याप्रमाणेच ४२ वर्षीय सलामीवीर ख्रिस गेलनेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केल्याची शक्यता आहे. याबाबत अधिकृत घोषणा केलेली नसली तरी ऑस्ट्रेलियाविरुद्ध १५ धावा करून बाद झाल्यावर त्याने सर्वांना बॅट उंचावत अभिवादन केले. तसेच गेल आणि ब्राव्होने एकमेकांना मिठी मारली. हे दृश्य पाहिल्यावर समालोचन करणारे इयन बिशप यांनी म्हटले की, ‘‘आपण गेलला बहुधा वेस्ट इंडिजच्या कपड्यांमध्ये अखेरचे पाहत आहोत.’’ तडाखेबाज फलंदाज गेलने विंडीजकडून ७८ ट्वेन्टी-२० सामन्यांत दोन शतकांच्या मदतीने १८८४ धावा केल्या, तर ब्राव्होने ९१ सामन्यांत १,२५५ धावा करतानाच ७८ गडी बाद केले.