ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा : पूर्वपरीक्षेत लक्षवेधी चमक

ऑस्ट्रेलियाने दिलेले १५३ धावांचे लक्ष्य भारताने १७.५ षटकांत गाठले.

भारताचे ऑस्ट्रेलियावर आठ गडी राखून वर्चस्व; रोहितचे दमदार अर्धशतक

गोलंदाजांच्या सांघिक कामगिरीनंतर कर्णधार रोहित शर्माच्या (४१ चेंडूंत ६० धावा डाव सोडला) अर्धशतकाच्या जोरावर भारताने ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील दुसऱ्या सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाला आठ गडी आणि १३ चेंडू राखून सहज नामोहरम केले. सलग दोन लढती जिंकून भारताने रविवारी पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या ‘अव्वल-१२’ फेरीतील महामुकाबल्यासाठी आपली पूर्ण तयारी झाल्याचे सिद्ध केले.

ऑस्ट्रेलियाने दिलेले १५३ धावांचे लक्ष्य भारताने १७.५ षटकांत गाठले. रोहितने के. एल. राहुलसह (३९) ६८ धावांची सलामी दिल्यावर सूर्यकुमार यादवच्या (नाबाद ३८) साथीने दुसऱ्या गड्यासाठी ५९ धावांची भर घालून विजयाची पायाभरणी केली. हार्दिक पंड्याने (नाबाद १४) षटकार लगावत संघाचा विजय साकारला.

तत्पूर्वी, आघाडीची फळी ढेपाळल्यानंतर स्टीव्ह स्मिथ (५७), मार्कस स्टोयनिस (नाबाद ४१) आणि ग्लेन मॅक्सवेल (३७) यांनी दिलेल्या योगदानामुळे ऑस्ट्रेलियाने ५ बाद १५२ धावांपर्यंत मजल मारली.

संक्षिप्त धावफलक

ऑस्ट्रेलिया : २० षटकांत ५ बाद १५२ (स्टीव्ह स्मिथ ५७, मार्कस स्टोयनिस नाबाद ४१; रविचंद्रन अश्विन २/८) पराभूत वि. भारत : १७.५ षटकांत २ बाद १५३ (रोहित शर्मा ६० डाव सोडला, के. एल. राहुल ३९, सूर्यकुमार यादव नाबाद ३८)

कोहली गोलंदाजीचा सहावा पर्याय?

विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यात गोलंदाजी करून भारतासाठी सहाव्या गोलंदाजाची भूमिका बजावण्याचे संकेत दिले. कोहलीने दोन षटकांत १२ धावा दिल्या. हार्दिक पंड्या विश्वचषकात गोलंदाजी करणार की नाही, याविषयी अद्याप संभ्रम कायम आहे. त्यामुळे फलंदाजीला न उतरलेल्या कोहलीने गोलंदाजीद्वारे चेंडू हाताळत संघ व्यवस्थापनासह चाहत्यांनाही दिलासा दिला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Twenty20 cricket world cup captain rohit sharma by hardik pandya akp

Next Story
ऑलिम्पिक पदकात पुण्याचाही वाटा -सायना
ताज्या बातम्या