विजयवीराच्या भूमिकेसाठी हार्दिक सज्ज

यंदाची ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा कारकीर्दीच्या दृष्टीने सर्वाधिक आव्हानात्मक ठरणार असून महेंद्रसिंह धोनीच्या अनुपस्थितीत भारतासाठी विजयवीराची भूमिका बजावण्यासाठी आपण सज्ज आहोत, अशी प्रतिक्रिया अष्टपैलू हार्दिक पंड्याने व्यक्त केली.

संयुक्त अरब अमिराती येथे सुरू असलेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात भारताची २४ ऑक्टोबरला पाकिस्तानशी सलामीची लढत होणार आहे. हार्दिकने गेल्या काही स्पर्धांपासून गोलंदाजी न केल्यामुळे त्याची तंदुरुस्ती आणि संघातील स्थानाबाबत सातत्याने प्रश्न विचारले जात आहेत. मात्र यंदा धोनी संघात नसला, तरी त्याच्या मार्गदर्शनाखाली संघासाठी विजयवीराची भूमिका बजावण्यासाठी उत्सुक असल्याचे हार्दिकने नमूद केले.

‘‘वैयक्तिकदृष्ट्या हा विश्वचषक माझ्यासाठी फार महत्त्वाचा आहे. गेला काही काळ माझी परीक्षा पाहणारा ठरल्याने या वेळी मी स्वत:ला सिद्ध करण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेन. यंदा धोनीचा संघात समावेश नसल्याने अखेरच्या षटकांत फटकेबाजी करून विजयवीर होण्याचे आव्हान माझ्यापुढे असेल. मी हे आव्हान स्वीकारण्यासाठी सज्ज आहे,’’ असे हार्दिक म्हणाला.

‘‘इतरांसाठी धोनी हा महान खेळाडू असला तरी माझ्यासाठी तो मोठ्या भावाप्रमाणे आहे. २०१९ मध्ये माझ्यावर काही काळासाठी बंदी घालण्यात आली होती. त्या वेळी धोनीनेच मला सर्वप्रथम सावरले. त्यामुळे आता त्याच्या मार्गदर्शनाखाली फलंदाजीच्या बळावर संघाला सामने जिंकवून देण्यासाठी मी उत्सुक आहे,’’ असेही हार्दिकने सांगितले. विश्वचषकात गोलंदाजी करण्याबाबतच्या मुद्द्यावर मात्र त्याने भाष्य करणे टाळले.

…अन्यथा पेट्रोल पंपावर कार्यरत असतो!

क्रिकेटपटूंना मिळणाऱ्या मानधनावर अनेकदा टीका केली जाते; परंतु पैशांना महत्त्व दिले नसते, तर आज मी पेट्रोल पंपावर काम करत असतो, असे स्पष्ट मत हार्दिकने व्यक्त केले. ‘‘पैसे प्रत्येकाच्याच आयुष्यात महत्त्वाचे असतात. अनेक जण युवा पिढीने पैशांवर लक्ष केंद्रित करू नये, असे सुचवतात; परंतु मी त्यांच्याशी सहमत नाही. किंबहुना पैसे तुम्हाला ध्येय गाठण्यासाठी प्रेरणा देतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या कार्याशी एकनिष्ठ राहण्याबरोबरच पैशांचा विचार करणे तितकेच गरजेचे आहे,’’ असे हार्दिकने सांगितले.

लक्ष्मणने ‘एनसीए’चे अध्यक्षपद नाकारले

नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मणने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे (एनसीए) अध्यक्षपद नाकारले आहे. राहुल द्रविड भारताचे प्रशिक्षकपद स्वीकारणार असल्याने त्याच्याऐवजी या अकादमीतील प्रमुखाची भूमिका लक्ष्मणने सांभाळावी, अशी ‘बीसीसीआय’ची इच्छा होती. परंतु सध्या ‘आयपीएल’मधील सनरायजर्स हैदराबादचा मार्गदर्शक आणि बंगाल रणजी संघाचा फलंदाजी सल्लागार या दोन जबाबदाºया लक्ष्मणवर असल्याने त्याने हा प्रस्ताव नाकारला.