आज ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यात भारताचे प्रथम पसंतीचे खेळाडू खेळणार

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी पूर्णपणे सज्ज असल्याचे इंग्लंडविरुद्धच्या सराव सामन्यातील विजयाद्वारे दाखवून दिले. त्यामुळे आता बुधवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या सराव लढतीत फलंदाजांच्या क्रमातील यशासाठी अखेरचे प्रयोग करण्याची संधी भारताला आहे.

येत्या रविवारी भारताची अव्वल-१२ फेरीतील सलामीच्या सामन्यात पाकिस्तानशी गाठ पडणार आहे. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताची ही अखेरची ट्वेन्टी-२० स्पर्धा असून रवी शास्त्रीसुद्धा या स्पर्धेनंतर मुख्य प्रशिक्षकपदावरून पायउतार होणार आहेत. मार्गदर्शक महेंद्रसिंह धोनी, कोहली आणि शास्त्री यांचे त्रिकूट विश्वचषकात काय कमाल करणार, याकडे भारतीय क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे. २०१६च्या विश्वचषकानंतर झालेल्या ७२ ट्वेन्टी-२० सामन्यांपैकी ४५ लढती भारताने जिंकल्या आहेत.

दुसरीकडे, आरोन फिंचच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने पहिल्या सराव लढतीत न्यूझीलंडवर अखेरच्या षटकात सरशी साधली. डेव्हिड वॉर्नरची सुमार कामगिरी ऑस्ट्रेलियाला सतावत असून ‘आयपीएल’मध्ये चमकणाऱ्या ग्लेन मॅक्सवेलवर त्यांची प्रामुख्याने भिस्त आहे.

रोहितला सरावाची संधी?

विश्वचषकात रोहित शर्मा आणि के. एल. राहुल सलामीला उतरणार असल्याचे कोहलीने स्पष्ट केले आहे; परंतु इंग्लंडविरुद्ध राहुल (५१ धावा) आणि इशान किशन (७०* डाव सोडला) या दोघांनी सलामीला येत धडाकेबाज अर्धशतक झळकावले. त्यामुळे रोहितला ऑस्ट्रेलियाविरुद्ध तरी सलामीची संधी देण्यात येणार का, हे पाहणे रंजक ठरेल. ऋषभ पंतने विजयवीराची भूमिका बजावली. मात्र सूर्यकुमार यादव अपयशी ठरल्याने किशनला मधल्या फळीत खेळवण्याचा पर्याय उपलब्ध आहे.

हार्दिकबाबत चिंता कायम

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भुवनेश्वर कुमार (चार षटकांत ५४ धावा) आणि फिरकीपटू राहुल चहर (चार षटकांत ४३ धावा) यांच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेण्यात आला. त्यामुळे भारताच्या सहाव्या गोलंदाजीच्या पर्यायाचा शोध अद्याप सुरूच आहे. हार्दिकने फलंदाजीत योगदान दिले असले, तरी बुधवारी तो गोलंदाजी करून संघ व्यवस्थापनाला दिलासा देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याशिवाय पहिल्या लढतीत संधी न मिळालेल्या शार्दूल ठाकूर, रवींद्र जडेजा आणि वरुण चक्रवर्ती यांची अव्वल-१२ फेरीपूर्वी चाचपणी घेणे महत्त्वाचे ठरू शकते.

’ वेळ : दुपारी ३.३० वा. ’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोटर्स १, १ हिंदी (संबंधित एचडी वाहिन्या)