ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या ‘अव्वल-१२’ फेरीमध्ये रविवारी होणाऱ्या न्यूझीलंड-अफगाणिस्तान लढतीच्या निकालाद्वारे ‘गट-२’मधून उपांत्य फेरीत कोणता संघ पात्र ठरेल हे निश्चित होऊ शकेल. म्हणजेच भारताचे भवितव्य या लढतीवर अवलंबूल आहे.

अफगाणिस्तानने न्यूझीलंडविरुद्ध आश्चर्यकारक विजय मिळवल्यास भारताचे आव्हान शाबूत राहू शकेल. मग नामिबियाविरुद्धच्या अखेरच्या लढतीत भारताला मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल. परंतु न्यूझीलंडने अपेक्षेनुसार अफगाणिस्तानला नमवल्यास भारतासाठी अखेरचा सामना निष्फळ ठरेल.

न्यूझीलंडने शुक्रवारी नामिबियाला सहज हरवले. आघाडीची फळी अपयशी ठरल्यानंतर जिम्मी निशाम आणि ग्लेन फिलिप्स यांनी न्यूझीलंडला समाधानकारक धावसंख्या उभारून दिली. ट्रेंट बोल्ट, टिम साऊदी आणि अ‍ॅडम मिल्ने यांचा समावेश असलेला वेगवानम मारा तसेच इशा सोधी आणि मिचेल सँटनर यांचा फिरकी मारा हे न्यूझीलंडच्या गोलंदाजीचे वैशिष्ट्य आहे.

अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी उत्तम धावसंख्या उभारल्यास नंतर रशीद खानसह गोलंदाजांना कामगिरी उंचावावी लागेल. दुखापतीमुळे मुजीब ऊर रेहमानच्या अनुपस्थितीची उणीव अफगाणिस्तानला भासेल.

’  वेळ : दुपारी ३.३० वा. ’  थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी.