पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत कोहली सलामीऐवजी तिसऱ्या क्रमांकावर

ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचे पहिल्या पसंतीचे सलामीवीर कोण असणार, या प्रश्नाचे उत्तर अखेर सोमवारी कर्णधार विराट कोहलीनेच दिले. अनुभवी रोहित शर्माच्या साथीने ‘आयपीएल’मध्ये छाप पाडणाऱ्या के. एल. राहुललाच सलामीसाठी प्राधान्य दिले जाईल, असे कोहलीने सांगतानाच स्वत: तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणार असल्याची माहिती दिली.

संयुक्त अरब अमिराती येथे चालू असलेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात रविवार, २४ ऑक्टोबर रोजी भारताची पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी गाठ पडणार आहे, परंतु सोमवारी इंग्लंडविरुद्ध झालेल्या सराव सामन्यातील नाणेफेकीच्या वेळी कोहलीने किमान भारताच्या आघाडीच्या फळीचे समीकरण स्पष्ट केले.

‘‘आयपीएलपूर्वी मी नक्कीच सलामीला उतरण्याचा विचार करत होतो, परंतु राहुलच्या ‘आयपीएल’मधील कामगिरीकडे दुर्लक्ष करणे कठीण आहे. रोहित साहजिकच तुमचा पहिला पसंतीचा सलामीवीर असून त्याच्या साथीने राहुलला प्राधान्य दिले जाईल. त्यामुळे मी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेन,’’ असे कोहली म्हणाला.

इंग्लंडविरुद्ध झालेल्या ट्वेन्टी-२० मालिकेतील अखेरच्या लढतीत कोहली आणि रोहित सलामीला आले होते. त्याशिवाय इशान किशननेसुद्धा त्या मालिकेसह श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेतही छाप पाडून विश्वचषकात सलामीच्या स्थानासाठी दावेदारी पेश केली, परंतु कोहली आणि संघ व्यवस्थापनाने रोहित आणि राहुल यांच्यावरच विश्वास दर्शवला आहे.

‘‘पाकिस्तानविरुद्धच्या लढतीसाठी आमचे ११ खेळाडू कोणते असतील, हे जवळपास निश्चित झाले आहे, परंतु आघाडीच्या फळीव्यतिरिक्त अन्य खेळाडूंविषयी मी आता भाष्य करू इच्छित नाही. दोन सराव सामन्यांद्वारे लय मिळवण्याची संधी असल्याने प्रत्येकाने याचा लाभ घ्यायला हवा,’’ असे कोहलीने सांगितले.

प्रशिक्षक शास्त्री पुन्हा समालोचनाकडे?

दुबई : ट्वेन्टी-२० विश्वचषकानंतर भारताचे मुख्य प्रशिक्षक पुन्हा समालोचनाकडे वळणार असल्याची माहिती संघ व्यवस्थापनातीलच सदस्याने दिली. अमिरातीतील विश्वचषकानंतर शास्त्री यांचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपणार आहे. ‘‘शास्त्री यांना जवळपास २० वर्षे समालोचनाचा अनुभव आहे. त्यामुळे भारताच्या प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर ते पुन्हा या क्षेत्राकडे वळण्याचा विचार करत आहेत. त्याशिवाय पुढील ‘आयपीएल’मध्ये दोन नव्या संघांची भर पडणार असल्याने ते या स्पर्धेत प्रशिक्षकाच्या भूमिकेतही दिसू शकतात,’’ असे त्या सदस्याने सांगितले.