टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा : कोहली-आझमच्या नेतृत्वाचा कस!

भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना २४ ऑक्टोबरला होणार आहे

भारत-पाकिस्तान विश्वचषक सामन्याबाबत मॅथ्यू हेडनचे मत

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या सामन्यात विराट कोहली आणि बाबर आझम यांच्या नेतृत्वाचा कस लागेल, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडनने व्यक्त केले. हेडन सध्या पाकिस्तान संघाचा फलंदाजीचा सल्लागार म्हणून कार्यरत आहे.

भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना २४ ऑक्टोबरला होणार आहे. या सामन्यात चुका करणे भारताचा कर्णधार कोहली आणि पाकिस्तानचा कर्णधार आझम यांना महागात पडेल, असे मत हेडनने मांडले आहे. त्याने महेंद्रसिंह धोनी आणि ईऑन मॉर्गन यांचे उदाहरण देत नेतृत्वाचे महत्त्व विशद केले. या दोघांना ‘आयपीएल’मध्ये फलंदाजीत फारसे योगदान देता आले नाही. पण त्यांनी कर्णधार म्हणून आपापल्या संघांना अंतिम फेरीपर्यंत पोहोचवले.

‘‘धोनी आणि मॉर्गन यांना फलंदाज म्हणून अपेक्षित कामगिरी करता आली नाही. मात्र, त्यांनी संघांचे ज्या प्रकारे नेतृत्व केले आणि संयुक्त अरब अमिराती येथील वातावरणात जे निर्णय घेतले, त्यामुळेच त्यांचे संघ अंतिम फेरी गाठू शकले. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आगामी सामन्यात अवघड खेळपट्ट्यांवर दोन्ही कर्णधारांचा कस लागेल,’’ असे हेडन म्हणाला. तसेच के. एल. राहुल आणि ऋषभ पंत या भारतीयांपासून पाकिस्तानला सावध राहावे लागेल, असा इशारा हेडनने दिला आहे.

भारतीय संघ जेतेपदासाठी दावेदार -इन्झमाम

भारतीय संघ ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकण्यासाठी प्रमुख दावेदार असल्याचे पाकिस्तानचा माजी कर्णधार इन्झमाम-उल-हकने म्हटले आहे. ‘‘अमिराती येथील परिस्थितीत भारताचे पारडे जड असल्याचे म्हणता येईल. ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या जेतेपदासाठी भारतीय संघ प्रमुख दावेदार आहे. सराव सामन्यात त्यांनी विराट कोहलीच्या अनुपस्थितीतही ऑस्ट्रेलियाने दिलेले १५५ धावांचे आव्हान सहज पार केले. आशियाई खेळपट्ट्यांवर त्यांना नमवणे अवघड आहे,’’ असे इन्झमाम म्हणाला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Twenty20 cricket world cup virat kohli babar azam australia by matthew hayden akp

Next Story
ऑलिम्पिक पदकात पुण्याचाही वाटा -सायना
ताज्या बातम्या