क्वेबेऱ्हा (दक्षिण आफ्रिका) : महिला ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारतीय संघाच्या मोहिमेस इंग्लंडविरुद्धच्या पराभवाने धक्का बसला. आता उपांत्य फेरीच्या आशा कायम राखण्यासाठी भारतीय महिला संघाला सोमवारी आयर्लंडविरुद्ध मोठय़ा विजयाची आवश्यकता असेल.इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर भारताचे तीन सामन्यांत दोन विजयांसह ४ गुण असून ते गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. इंग्लंडने सलग तीन विजयासह उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे आता हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला आयर्लंडविरुद्ध मोठय़ा फरकाने विजय मिळवावा लागणार आहे. या परिस्थितीत भारताच्या फलंदाजांची महत्त्वाची भूमिका असेल. कर्णधार हरमनप्रीत आणि शफाली वर्मा यांना अजून गुणवत्तेला न्याय देता आलेला नाही. भारताकडून केवळ युवा यष्टिरक्षक-फलंदाज रिचा घोषच्या कामगिरीत कमालीचे सातत्य आहे. जेमिमा रॉड्रिग्ज पहिल्या सामन्यानंतर अपयशी ठरली आहे. उपकर्णधार स्मृती मानधनाने इंग्लंडविरुद्ध अर्धशतक साकारले. आता आयर्लंडविरुद्ध पुन्हा स्मृतीकडून आक्रमक खेळीची संघाला अपेक्षा असेल.गोलंदाजीत रेणुका सिंह ठाकूर आणि दीप्ती शर्मा वगळता भारतीय गोलंदाजांना चमक दाखवता आलेली नाही. या दोघींना पूजा वस्त्रकार आणि राधा यादव यांची साथ मिळणे गरजेचे आहे. वेळ : सायं. ६.३० वा.थेट प्रसारण : स्टार स्पोर्ट्स २