गेकबेर्हा (दक्षिण आफ्रिका) : पहिल्या दोन सामन्यांत दडपण हाताळत विजय मिळवणाऱ्या भारतीय महिला संघापुढे ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत शनिवारी इंग्लंडचे आव्हान असेल. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असणाऱ्या इंग्लंडविरुद्ध विजय मिळवल्यास भारताची उपांत्य फेरीसाठी दावेदारी अधिक भक्कम होईल. प्रत्येक गटातील अव्वल दोन स्थानांवरील संघ उपांत्य फेरीत पोहोचतील.
इंग्लंडविरुद्ध भारताच्या आघाडीच्या फळीतील फलंदाजांना आपल्या कामगिरीत सुधारणा करावी लागेल. भारताच्या १९ वर्षांखालील विश्वचषक विजेत्या संघाची कर्णधार शफाली वर्माला चांगल्या सुरुवातीचे रूपांतर मोठय़ा धावसंख्येत करता आलेले नाही. दुखापतीतून पुनरागमन करणाऱ्या स्मृती मानधनाने खेळपट्टीवर वेळ घालवणे गरजेचे आहे. जेमिमा रॉड्रिग्जला कामगिरीत सातत्य राखावे लागेल. तर कर्णधार हरमनप्रीत कौरलाही लवकरच लय मिळवावी लागेल.
भारतीय फलंदाजांना चार्ली डीन, सोफी एक्लेस्टोन आणि सारा ग्लेन या इंग्लंडच्या फिरकी गोलंदाजांचा सामना करावा लागणार आहे. अनुभवी अष्टपैलू दीप्ती शर्माने संघासाठी निर्णायक योगदान दिले आहे. दुसरीकडे, भारताप्रमाणे इंग्लंडही उपांत्य फेरी गाठण्याचा प्रबळ दावेदार आहे.
वेळ : सायं. ६.३० वा.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स २