उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाचे आव्हान; मानधना, हरमनप्रीतच्या कामगिरीकडे नजर
पीटीआय, केपटाऊन
ट्वेन्टी-२० महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाचा सामना गुरुवारी पहिल्या उपांत्य सामन्यात मजबूत समजल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाशी होणार आहे. मात्र, भारताला अंतिम फेरी गाठायची असल्यास आपल्या कामगिरीत सुधारणा करणे गरजेचे आहे.




गेल्या पाच वर्षांत भारताने आपली कामगिरी उंचावली आहे. मात्र, त्यांना ‘आयसीसी’ स्पर्धेचे जेतेपद मिळवता आलेले नाही. अपेक्षेप्रमाणे भारताने पुन्हा एकदा उपांत्य फेरीत स्थान मिळवले आहे. भारताला गेल्या काही काळात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध चांगली कामगिरी करता आलेली नाही. यामध्ये बाद फेरीच्या सामन्यांचाही समावेश आहे. ऑस्ट्रेलियाने गेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताला नमवले आणि बर्मिगहॅम येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदकाच्या लढतीत ही ऑस्ट्रेलियाने भारतावर विजय साकारला होता. त्यामुळे गुरुवारी होणाऱ्या निर्णायक सामन्यात भारतीय खेळाडूंकडून संघ व्यवस्थापनाला चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने साखळी फेरीत चार पैकी तीन सामने जिंकले आहेत. भारताला एकमात्र सामना इंग्लंडकडून गमवावा लागला. भारताची स्पर्धेतील कामगिरी पाहता संघाला अंतिम फेरी गाठायची असल्यास सर्वोत्तम कामगिरी करण्याशिवाय पर्याय नाही. यासह कमीत कमी निर्धाव चेंडू खेळण्याचा भारताचा प्रयत्न असेल. सलामीवीर शफाली वर्माने तीन वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. मात्र, तिला आपल्या चुकांवर मेहनत घेणे गरजेचे आहे. कर्णधार हरमनप्रीत स्वत: दबावाखाली असून तिला विश्वचषक स्पर्धेत निर्णायक खेळी करता आलेली नाही. हरमनप्रीत मोठे फटके मारण्यास सक्षम असली तरीही, तिच्याकडून सर्वोत्तम कामगिरीची अपेक्षा संघाला असेल. जेमिमा रॉड्रिग्जने स्पर्धेत आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. तारांकित फलंदाज स्मृती मानधनाची खेळी ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध निर्णायक ठरेल.
गोलंदाजी विभागात वेगवान गोलंदाज रेणुका सिंह ठाकुरने आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. तिने आतापर्यंत सात बळी मिळवले असून इंग्लंडविरुद्ध १५ धावांत ५ बळी ही तिची सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे. भारताच्या फिरकी विभागाची धुरा ही दिप्ती शर्माकडे असेल. पूजा वस्त्रकार, राजेश्वरी गायकवाड आणि राधा यादव यांना ऑस्ट्रेलियाविरुद्ध चांगली गोलंदाजी करावी लागेल. दुसरीकडे, मेग लॅिनगच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघाने ट्वेन्टी-२० मध्ये सलग २२ सामने जिंकत उपांत्य फेरी गाठली आहे. ऑस्ट्रेलियाने मार्च २०२१मध्ये न्यूझीलंडविरुद्ध एक ट्वेन्टी-२० सामना गमावल्यानंतर कोणत्याही प्रारूपात केवळ दोन सामने गमावले आहेत. ऑस्ट्रेलियाने डिसेंबरमध्ये भारताविरुद्ध मुंबईत झालेली मालिका ४-१ अशी जिंकली.
वेळ : सायं. ६.३० वा.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स २