एकीकडे आयपीएलची धुमधाम ऐन रंगात आली असताना बंगळुरू संघाकडून आयपीएल खेळणारा दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डीव्हिलियर्स याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली आहे. नुकतीच त्याने ट्विटरवरून याबाबतचा व्हिडीओ ट्विट करून हि माहिती दिली आहे. डीव्हिलियर्सच्या या अचानक निवृत्ती घेण्याच्या निर्णयामुळे सर्व स्तरांतून आश्चर्य आणि काही प्रमाणात खंत व्यक्त होत आहे. डीव्हिलियर्सच्या अचानक निवृत्तीमुळे क्रिकेटप्रेमींना धक्का बसला आहे. क्रिकेटपटू, क्रिकेटविषयक माहिती असणारे तज्ज्ञमंडळी, क्रिकेट संदर्भातील संकेतस्थळे अशा विविध स्तरांतून त्याच्या या निर्णयावर ट्विटच्या माध्यमातून लोक व्यक्त होत आहेत.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपल्या भावना व्यक्त केल्या. त्याने लिहिले कि मैदानावरील फलंदाजीप्रमाणेच तुला तुझ्या आयुष्यातही ३६० अंश यश मिळू दे. क्रिकेट तुझी नेहमीच आठवण काढेल. तूझी उणीव नेहमीच भासेल. तुझ्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

भारताचा जलदगती डावखुरा गोलंदाज आर पी सिंग याने ट्विट केले आहे कि मैदानात ३६० अंशात फटके मारणेही सहजपणे शक्य असते हे एबी डीव्हिलियर्सने दाखवून दिले. क्रिकेटविश्वाला तू दिलेल्या आठवणींबाबत धन्यवाद. आणि तुला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा!

याबाबत माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग म्हणाला कि तुझ्या यशस्वी कारकिर्दीबद्दल तुझे अभिनंदन. तू चाहत्यांचा सर्वात लाडका खेळाडू होतास. तुझ्या अनुपस्थितीमुळे आता क्रिकेट गरीब झाले. मात्र तू तुझ्या चाहत्यांना असाच आनंद देत राहा.

डॅनियल अलेक्झांडर यांनी लिहिले आहे कि डीव्हिलियर्स याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली आहे. तो दिलशानच्या तोडीचा अष्टपैलू क्रिकेटपटू होता. दोघांनी सर्व क्रमांकावर गोलंदाजी आणि फलंदाजी केली, यष्टीरक्षण केले, संघाचे कर्णधारपद भूषवले आणि दोघेही उत्कृष्ट फिल्डर होते.

एक प्रसिद्ध स्टॅटेस्टिशियन असलेले सारंग भालेराव यांनी लिहिले आहे कि डीव्हिलियर्स निवृत्त होणे हे खूपच धक्कायदायक आहे. तू आमचे खूप मनोरंजन केलेस. हे चॅम्प, तुला पुढील आयुष्यसाठी शुभेच्छा!

तर आयपीएलमध्ये ज्या संघाकडून डीव्हिलियर्स खेळतो, त्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानेही डीव्हिलियर्सला भावुक शब्दात संदेश दिला आहे. डीव्हिलियर्सने निवृत्तीचा निर्णय जरी अचानक घेतला असेल तरी त्यामागे एक विचार असणार याची आम्हाला खात्री आहे. आणि महत्वाचे म्हणजे पुढील वर्षी म्हणजेच २०१९ साली होणाऱ्या आयपीएलसाठी तुला यावंच लागेल, असे ट्विट बंगळुरू संघाकडून करण्यात आले आहे.