शनिवारचा दिवस आयपीएल इतिहासात विक्रमदिन म्हणून नोंदला जाईल. त्याचवेळी हा दिवस स्पर्धेची आणि एकूणच टी२० क्रिकेटची लोकप्रियता कमी करणारा दिवस असू शकतो. कातळासमान पाटा पिचवर अशक्य अशा उकाड्यात आर्द्रतेत गोलंदाजांची कत्तल एवढंच या दिवसाचं वर्णन होईल. प्रत्येक धावेगणित, चौकारषटकारागणिक नवनवे विक्रम रचले जात होते आणि त्याचवेळी गोलंदाज हिरमुसून बघत होते.

शनिवारचे दोन्ही सामने मिळून ९८६ धावा कुटल्या गेल्या. अनेक महिन्यात मिळूनही एवढ्या धावा होत नाहीत तेवढ्या ६ तासात झाल्या. गोलंदाजांची कबर खणल्या गेलेल्या या लढतींमध्ये ५९ षटकार चोपले गेले. दुसऱ्या शब्दांत सांगायचं तर ५९ चेंडूत ३५४ धावा लुटल्या गेल्या. या दोन सामन्यात मिळून ९६ चौकार पिटाळण्यात आले. ९६ चेंडूत ३८४ धावा झाल्या. चौकार आणि षटकार मिळून ७३८ धावा झाल्या. गोलंदाजांनी मैदानावर यावं आणि अपमान सहन करावा अशा या दोन लढती होत्या. शनिवारचे दोन सामने पाहिल्यानंतर देशात कोणी मला गोलंदाज व्हायचं आहे असं म्हणायची शक्यता वाटत नाही. काही वर्षांपूर्वी EA Sports नावाचा व्हीडिओ गेम होता. व्हीडिओ गेम वाटावा अशा थाटात फटकेबाजी झाली. चौकार, षटकार पाहायला आवडणारी मंडळीही कंटाळली. कुठल्याही गोष्टीचं अति झालं की अजीर्ण होतं. काल तसंच झालं.

शनिवारी झालेल्या पहिल्या लढतीत दिल्लीने २६४ धावांचा डोंगर उभारला. एकेकाळी वनडेत म्हणजे ३०० चेंडूत ही धावसंख्या मोठी मानली जायची. राजधानी दिल्लीत टळटळीत भाजक्या उन्हात १२० चेंडूत २६४ धावा झाल्या. अनुभवी के.एल.राहुलने अतरंगी फटक्यांच्या नादी न लागताना ६७ चेंडूत नाबाद १५२ धावांची खेळी केली. नितीश राणाने ४४ चेंडूत ९१ धावांची खेळी साकारली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ९६ चेंडूत २२० धावांची भागीदारी साकारली. पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरने ६ गोलंदाजांचा वापर केला. एकाही गोलंदाजाचा इकॉनॉमी रेट १०च्या खाली नव्हता.

धावांचा इतका मोठा डोंगर उभारल्यावर दिल्लीचे खेळाडू आनंदी आणि निवांत असणं अपेक्षित होतं. मात्र प्रचंड आकाराच्या वजनाच्या बॅट्स, दिल्लीच्या मैदानाचा लहानसा आकार, फलंदाजीला अनुकूल खेळपट्टी आणि पंजाबच्या खेळाडूंचा फॉर्म यामुळे दिल्लीचं डगआऊट चिंतेत दिसत होतं. दोन डावांच्या दरम्यान पुढच्या काही तासात आपल्यावर काय परिस्थिती ओढवू शकते याचा अंदाज त्यांना आला असावा.

प्रभसिमरन सिंग आणि प्रियांश आर्य या धुमाकूळ जोडीमुळे तिसऱ्या षटकात संघाचं अर्धशतक फलकावर लागलं. पॉवरप्लेच्या शेवटच्या म्हणजे सहाव्या षटकानंतर पंजाबच्या ११६ धावा झाल्या होत्या. आवश्यक रनरेट १०.६४ हवा असताना पंजाबची बिनीची जोडी १९.३३च्या रनरेटने बुकलून काढत होती. १७ चेंडूत ४३ धावा करून प्रियांश बाद झाला. त्याचा स्ट्राईकरेट होता २५२.९४. पुढच्याच षटकात फक्त २६ चेंडूत ७६ धावा चोपून प्रभसिमरन तंबूत परतला. त्याचा स्ट्राईकरेट होता २९२. यानंतर सरपंच नावाने प्रसिद्ध झालेला कर्णधार श्रेयस अय्यरने सूत्रं हाती घेतली. श्रेयसने २६ चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. त्याला दोन जीवदानं मिळाली. एवढ्या धावा करायच्या म्हणजे शेवटच्या षटकापर्यंत मुकाबला जाईल अशी अपेक्षा असते. तसं काहीही झालं नाही. १९व्या षटकातला शेवटचा चेंडू नटराजनने टाकला. तो ऑफस्टंपच्या बराच बाहेर असल्याने वाईड देण्यात आला. ७ चेंडू राखून म्हणजे ११४ चेंडूत पंजाबने २६५ धावा केल्या. श्रेयसने ३६ चेंडूत नाबाद ७१ धावांची खेळी केली.

दिल्लीपासून थोड्याच अंतरावर पिंक सिटीत दुसरा सामना रंगला. १५व्या वर्षाच्या वैभव सूर्यवंशीने तोडफोड फॉर्म कायम राखत ३७ चेंडूत ५ चौकार आणि १२ षटकारांसह १०३ धावांची अचंबित करणारी खेळी केली. त्याचा स्ट्राईकरेट होता २७८.३७. ध्रुव जुरेलने ५१ तर डोनाव्हन फरेराने ३३ धावा केल्या. राजस्थानने २२८ अशी समाधानकारक धावसंख्या उभारली. मात्र एवढ्या धावा करूनही त्यांच्या चेहऱ्यावर स्वस्थता नव्हती कारण हैदराबादकडे एकापेक्षा एक आक्रमक फटकेबाजी करणाऱ्या फलंदाजांची फळी होती. त्यांची भीती खरी ठरली. हैदराबादने १११ चेंडूतच २२९ धावा केल्या आणि सामना खिशात टाकला.अभिषेक शर्माने २९ चेंडूत ५७ तर इशान किशनने ३१ चेंडूत ७४ धावांची वादळी खेळी केली. नितीश कुमार रेड्डीने १८ चेंडूत ३६ धावा करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

दोन्ही सामन्यातले शतकवीर पराभूत संघात राहिले यापेक्षा अनाकलनीय आणि विचित्र काय म्हणावं. क्रिकेट हा बॅट आणि बॉल यांच्यातील द्वंद्वाचा मुकाबला आहे. पण यंदाचा हंगाम गोलंदाजांसाठी मरण असाच आहे. फलंदाजांकडे प्रचंड वजनाच्या बॅट आहेत. पल्लेदार षटकार मारायला त्या उत्तम आहेत. मैदानांचा आकार छोटा आहे आणि ते कमी की काय म्हणून बाऊंड्री आत आणली जाते. गोलंदाजांना एका षटकात बाऊन्सर टाकायला मर्यादा आहे. नोबॉल पडला तर पुढचा चेंडू फ्री हिट देण्यात येतो. रेषेच्या जरा इकडेतिकडे झाला तरी वाईड देण्यात येतो. खेळपट्टी कातळासमान असते. फलंदाज अक्रॉस जाऊन, पडून, स्टान्स बदलून कसाही फटके मारू शकतो. गोलंदाजाला रनअपदरम्यान बदल करण्याची मुभा नाही. फलंदाजांकडे ढिगावरी अस्त्रं आणि गोलंदाज शस्त्रहीन अशी ही एकांगी विषम लढत आहे. काही वर्षात गोलंदाजांऐवजी बॉलिंग मशीन पाहायला मिळाली तर आश्चर्य वाटायला नको.

शनिवारच्या दिवशी राजधानी दिल्ली असो किंवा जयपूर प्रचंड उकाडा होता. आर्द्रताही भयंकर होती. अवघ्या काही मिनिटात जर्सी घामाने भिजून जात होती. अशा रखरखीत वातावरणात गोलंदाजी करायची आणि फक्त मार खायचा हे किती अन्यायकारी आहे. मुळातच गोलंदाजांना दुखापतींची शक्यता जास्त असते. एखादा खेळाडू जास्तीत जास्त १० ते १५ वर्ष खेळू शकतो. टेस्ट, वनडे, टी२०, आयपीएल, डोमेस्टिक असं सगळं लक्षात घेता निम्मं पाऊण वर्ष तो खेळतच असतो. विश्रांतीसाठी पुरेसा वेळच नसतो. त्यात तो गोलंदाज असेल तर आणखीच कठीण.

शनिवारी झालेले दोन सामने विक्रमांसाठी वगैरे छान वाटू शकतात पण गोलंदाजांचं मानसिक आरोग्य याचाही विचार करावा लागेल. चेंडू टाकला की तो फक्त चौकार, षटकारच जाणार असेल तर किती नवीन मुलं गोलंदाजीकडे वळतील? ४ षटकात ६०-७० धावा कुटल्या जात असतील तर कोणाला गोलंदाज व्हावंसं वाटेल का? पैसे मिळतात म्हणून एवढा अपमान कोणी का सहन करावा? चौकार, षटकार चाहत्यांना आवडतात हा मुद्दा खरा असला तरी गोलंदाजांचं वर्चस्व राहील अशा खेळपट्या कधी तयार होणार? पाटा पिचवर षटकार खेचणारे फलंदाज आव्हानात्मक खेळपट्टीवर तग धरू शकत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. काही दिवसांपूर्वीच लखनौविरुद्धच्या लढतीत वैभव सूर्यवंशीचं काय झालं ते लक्षात ठेवणं आवश्यक. लखनौच्या डावखुऱ्या मोहसीन खानने पाच निर्धाव चेंडू टाकले. प्रत्येक चेंडूवर चौकार, षटकार लगावण्याचा वैभवचा प्रयत्न होता पण तो यशस्वी झाला नाही. सहाव्या चेंडूवर मोहसीनने वैभवला बाद केलं. चौकार,षटकार मिळाले नाहीत तर एकेरी-दुहेरी धावा काढून धावफलक हलता ठेवता येतो हे विक्रमवीर वैभव कधी शिकणार? चौकार-षटकार नाही बसले म्हणजे पत कमी झाली असं नसतं पण दुर्देवाने तसंच मानलं जातं.

काही दिवसांपूर्वीच पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरने सांगितलं की त्याने संघातल्या दोन खेळाडूंमध्ये षटकारांची स्पर्धा लावली आहे. जो सर्वाधिक षटकार लगावणार त्याला श्रेयस त्याची बॅट देणार आहे. संघातल्या खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी कर्णधाराची ही क्लृप्ती चांगलीच आहे. पण मेडन टाकल्यावर किंवा अमुक इतके निर्धाव चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजांसाठी स्पर्धा आहे का? अलीकडे मॅचअप्सच्या नादात चांगले गोलंदाज हरवून जात आहेत. डावखुरा फलंदाज डावखुऱ्या गोलंदाजांला तुडवून काढतो असं मॅचअप्स थिअरी सांगते. त्यामुळे डावखुरे गोलंदाज अलीकडे डावखुरा फलंदाज समोर असेल तर गोलंदाजीला येत नाहीत. काही दिवसांपूर्वीच अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांनी याच कारणास्तव गोलंदाजी केली नाही.

अमुक एका गोलंदाजासाठी आयपीएलचा सामना पाहूया असं केव्हा म्हटलं जाईल? १२० चेंडूत ११० धावा झाल्या तर गोलंदाजांचं कौतुक होईल का? एखाद्या गोलंदाजाने विकेट मेडन टाकली तर त्याला विशेष पुरस्कार मिळणार का? गोलंदाजाला प्रत्येक षटकामागे अमर्यादित बाऊन्सर टाकायला मिळतील का? हे सगळे प्रश्न आयपीएल प्रशासनासाठी बेदखल आहेत. गोलंदाज माणूस आहेत, त्यांना भावभावना आहेत हे विसरून चालणार नाही.