भारतात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेट स्पध्रेच्या सातव्या पर्वाच्या सामन्यांसाठी दोन पर्यायी देशांची निवड भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) शुक्रवारी होणाऱ्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीत होणार आहे.
दुसऱ्या आयपीएल स्पध्रेचे यजमान दक्षिण आफ्रिका या दावेदारीच्या स्पध्रेत अग्रेसर असून, संयुक्त अरब अमिरातीचे नावही चर्चेत आहे. ९ एप्रिल ते ३ जून या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे.
सार्वत्रिक निवडणुकांच्या तारखा घोषित झाल्यानंतर या ठिकाणांची निश्चिती करण्यात येईल. या स्पध्रेचा एक टप्पा भारतात आयोजित करण्यासंदर्भात येथील पुरस्कर्त्यांचे मोठे दडपण बीसीसीआयवर आहे.
‘‘बीसीसीआयच्या कार्यकारिणी समितीपुढे आयपीएल प्रशासकीय समितीच्या मागील बैठकीचा अहवाल समोर ठेवण्यात येईल. त्यानंतर कार्यकारिणी समिती आयपीएल प्रशासकीय समितीसमोर काही देशांचे पर्याय उपलब्ध करील,’’ असे बीसीसीआयच्या सूत्रांकडून समजते.

प्रशिक्षकांबाबत चर्चा होणार नाही; बीसीसीआयकडून स्पष्टीकरण
मुंबई : भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक जो डॅवेस यांच्या जागी भारताच्या सहाय्यक प्रशिक्षकाची नियुक्ती करण्यात येणार असल्याची बातमी काही दिवसांपूर्वी एका संकेतस्थळाने दिली होती. पण भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मात्र या बातमीमध्ये तथ्य नसल्याचे सांगतानाच या वृत्ताचे खंडन केले आहे.
‘‘याबाबत आमची कोणतीही योजना नाही. भुवनेश्वरमध्ये शुक्रवारी होणाऱ्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीमध्ये या विषयावर चर्चा होणार नाही,’’ असे बीसीसीआयचे सचिव संजय पटेल यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, ‘‘सध्या भारतीय संघ बांगलादेशला आशिया चषक खेळण्यासाठी गेला असून त्यानंतर आम्ही संघाचे प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांच्याशी चर्चा करणार आहोत.’’
फ्लेचर, डॅवेस आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक ट्रेव्हर पेनी यांचा करार ३१ मार्चला संपणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्लेचर आणि पेनी यांचा करार वाढवण्यात येणार असून गोलंदाजांची वाईट कामगिरी पाहता डॅवेस यांच्या जागी नवीन सहाय्यक प्रशिक्षकांची नियुक्त करण्यात येणार आहे.