टी२० सामना किती नाट्यमय ठरू शकतो याचा प्रत्यय झिम्बाब्वे-बांगलादेश लढतीच्या निमित्ताने चाहत्यांना आला. शेवटच्या षटकात विकेट, डेड बॉल, फोर असं सगळं पाहायला मिळालं आणि बांगलादेशने ४ विकेट्सनी तिसरा टी२० सामना जिंकला. या विजयासह बांगलादेशने तीन सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली. या दौऱ्यात बांगलादेशला टेस्ट आणि वनडे सीरिजमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. टी२० मालिकेतही त्यांना विजयासाठी संघर्ष करावा लागला.
बुलावायोचं क्वीन्स स्पोर्ट्स क्लबचं मैदान. झिम्बाब्वेने बांगलादेशला १४४ धावांचं लक्ष्य दिलं. बांगलादेशने या लक्ष्याचा पाठलाग करताना चांगली आगेकूच केली. शेवटच्या षटकात बांगलादेशला ६ चेंडूत ५ धावा असं सोपं समीकरण होतं. टी२० क्रिकेटमध्ये सहज वाटावं असं लक्ष्य होतं. ब्रॅड इव्हान्सच्या पहिल्या चेंडूवर तांझिड हसनने एक धाव घेतली. दुसऱ्या चेंडूवर इव्हान्सने मोसादेक होसेनला बाद केलं. फसव्या फुलटॉसवर मोसादेक त्रिफळाचीत झाला. तिसऱ्या चेंडूवर इव्हान्सने मोहम्मद सैफुदीनला बाद केलं. ऑफस्टंपबाहेरच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या मोहम्मदचा प्रयत्न रायन बर्लच्या हातात जाऊन विसावला. ४ चेंडूत ४ असं समीकरण होतं.
आठव्या क्रमांकावर मेहदी हसन मिराझ फलंदाजीला आला. इव्हान्स हॅट्टिकवर होता. इव्हान्सने पुन्हा एकदा चकवणारा फुलटॉस टाकला. मेहदी हसनने आडव्या बॅटने तो खेळायचा प्रयत्न केला. एलबीडब्ल्यूसाठी अपील झालं. मात्र इव्हान्सने चेंडू टाकत असतानाच पंचांनी डेड बॉलचा इशारा केला. इव्हान्स चेंडू टाकत असताना क्षेत्ररक्षक एका जागेवरून दुसऱ्या जागी जात असल्याचं पंचांच्या लक्षात आलं त्यामुळे त्यांनी डेड बॉलचा इशारा दिला. डेड बॉल देण्यात आल्याने धाव मिळू शकली नाही आणि चेंडूचीही नोंद झाली नाही. पंचांच्या निर्णयामुळे झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझा आणि गोलंदाज इव्हान्स भडकले. त्यांनी पंचांशी हुज्जत घातली मात्र निर्णय बदलला नाही. खेळ पुन्हा सुरू करण्याची सूचना पंचांनी केली.
मेहदी हसन मिराझने इव्हान्सच्या फुलटॉसवर खणखणीच चौकार लगावत बांगलादेशच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. बांगलादेशचे फलंदाज आणि इव्हान्स यांच्यात बाचाबाची पाहायला मिळाली. पंचांनी हस्तक्षेप करून प्रकरण वाढणार नाही याची काळजी घेतली.
सामन्यात काय घडलं?
झिम्बाब्वेने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. डिऑन मेयर्सच्या ७३ धावांच्या खेळीच्या बळावर झिम्बाब्वेने १४३ धावांची मजल मारली. ब्रायन बेनेटने ४७ धावा करत मेयर्सला चांगली साथ दिली. बाकी फलंदाजांना मोठी खेळी करण्यात अपयश आलं. बांगलादेशतर्फे मोहम्मद सैफुद्दीनने २ विकेट्स घेतल्या.
बांगलादेशची सुरुवातही डळमळीत झाली. मात्र सलामीवीर तांझिड हसनने नाबाद ६६ धावांची खेळी करत बांगलादेशच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. परवेझ होसेन इमॉन आणि तौहिद हृदॉय यांनी प्रत्येकी २४ धावा करत तांझिडला चांगली साथ दिली. झिम्बाब्वेतर्फे रिचर्ड नगारावा, ब्रॅड इव्हान्स, सिकंदर रझा यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
सिकंदर रझाचा विक्रम
झिम्बाब्वेसाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा विक्रम कर्णधार सिकंदर रझाने नावावर केला. रविवारी होत असलेला सामना सिकंदरचा झिम्बाब्वेसाठी खेळतानाचा ३१४वा सामना आहे. सिकंदरने हॅमिल्टन मासाकाटझाचा विक्रम मोडला. सिकंदरने २२ टेस्ट, १५६ वनडे आणि १३६ वनडेत झिम्बाब्वेचं प्रतिनिधित्व केलं आहे.
