U-19 World Cup : न्यूझीलंडवर मात करत बांगलादेश अंतिम फेरीत, भारताविरुद्ध रंगणार महामुकाबला

बांगलादेशकडून मोहमदुल हसनचं शतक

दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत विजेतेपदासाठी दोन आशियाई देश समोरासमोर येणार आहे. पहिल्या उपांत्य सामन्यात भारताने पाकिस्तानवर मात करत अंतिम फेरीत आपलं स्थान पक्क केलं. यानंतर दुसऱ्या उपांत्य सामन्यात बांगलादेशने न्यूझीलंडचं आव्हान परतवून लावत अंतिम फेरी गाठली. विजयासाठी दिलेलं २१२ धावांचं आव्हान बांगलादेशने ४ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. महमदुल हसन जॉयचं शतक हे बांगलादेशच्या विजयाचं प्रमुख कारण ठरलं.

नाणेफेक जिंकत बांगलादेशचा कर्णधार अकबर अलीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या गोलंजांनी हा निर्णय सार्थ ठरवत न्यूझीलंडला सुरुवातीच्या षटकांमध्येच धक्के दिले. अवघ्या ७४ धावांमध्ये न्यूझीलंडच्या आघाडीच्या फळीतले ४ फलंदाज माघारी परतल्यामुळे संघाची अवस्था बिकट झाली होती. यानंतर मधल्या फळीत निकोलस लिडस्टोन आणि बॅकहेम व्हिलर-ग्रिनॉलने महत्वपूर्ण खेळी करत न्यूझीलंडचा डाव सावरला. निकोलस लिडस्टोन माघारी परतल्यानंतर न्यूझीलंडच्या तळातल्या फलंदाजांनीही निराशा केली, मात्र बॅकहेमने एक बाजू लावून धरत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. याचसोबत त्याने न्यूझीलंडला द्विशतकी टप्पाही गाठून दिला. बॅकहेमने नाबाद ७५ धावांची खेळी केली.

प्रत्युत्तरादाखल बांगलादेशच्या संघाची सुरुवातही फारशी चांगली झाली नाही. परवेझ हुसेन आणि तांझिद हसन हे सलामीवीर फलंदाज अवघ्या ३२ धावांत माघारी परतले. मात्र यानंतर मोहमदुल हसन जॉयने संघाची सुत्र आपल्या हाती घेत डावाला आकार दिला. मोहमदुलने सर्वातआधी तौहीद हृदॉय आणि शहादत हुसैनसोबत महत्वपूर्ण भागीदारी रचली. यादरम्यान मोहमदुलने आपलं शतकही पूर्ण केलं. १०० धावा काढून तो माघारी परतला. मात्र त्यानंतर शहादत हुसैन आणि कर्णधार अकबल अलीने बांगलादेशच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. अंतिम फेरीत बांगलादेशची गाठ प्रियम गर्गच्या भारतीय संघाशी पडणार आहे, त्यामुळे या अंतिम सामन्यात कोणता संघ बाजी मारतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: U 19 world cup 2020 south africa bangladesh will meet india in semi final as they beat new zealand in semi final psd

Next Story
सचिन संपलेला नाही!
ताज्या बातम्या